आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिवाळी अंक ही खास महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. दरवर्षी विविध विषयांवर सुमारे चारशे दिवाळी अंक प्रकाशित केले जातात. या परंपरेने आता 115 वर्षे पूर्ण केली आहेत. दिवाळी अंकाची ही साहित्यिक परंपरा लक्षात घेऊन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने उत्कृष्ट दिवाळी अंकांसाठी स्पर्धा घेतली जाते.
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल बुधवारी येथे जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत उत्कृष्ट दिवाळी अंकासाठीचे अ. स. गोखले स्मृतिप्रीत्यर्थ 'रत्नाकर पारितोषिक' 'लोकमत' या दिवाळी अंकाला, चंद्रकांत शेवाळे पुरस्कृत 'विविध ज्ञानविस्तारकर्ते रावसाहेब मोरमकर पारितोषिक 'शब्दालय' या दिवाळी अंकाला, 'मासिक मनोरंजनकार का. र. मित्र पारितोषिक' 'अक्षरदान' या दिवाळी अंकाला, 'शं. वा. किर्लोस्कर पारितोषिक' 'सृजनसंवाद' या दिवाळी अंकाला, डेलिहंट पुरस्कृत उत्कृष्ट ऑनलाईन दिवाळी अंकाचे पारितोषिक 'गोदातीर्थ दिवाळी इ-विशेषांक' या दिवाळी अंकाला देण्यात येणार आहे.
'जानकीबाई केळकर' स्मृतिप्रीत्यर्थ 'उत्कृष्ट बालवाङ्मयदिवाळी अंकाचे पारितोषिक' 'निर्मळ रानवारा' या दिवाळी अंकाला तसेच दिवाळी अंकातील उत्कृष्ट कथेसाठीचे 'दि. अ. सोनटक्के पारितोषिक' 'आकांक्षा' या दिवाळी अंकातील रवींद्र लाखे यांच्या 'दृश्याला रेषा नसतात' या कथेला जाहीर करण्यात आले आहे. तसेच उत्कृष्ट ललित लेखासाठीचे 'अनंत काणेकर पारितोषिक' 'कृष्णाकाठ' या दिवाळी अंकातील वर्षा काळे यांच्या 'छम छम!!!' या लेखाला जाहीर करण्यात आले आहे.
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवार 28 जून 2022 रोजी सायंकाळी 6 वाजता प्रभू ज्ञानमंदिर सभागृह, निवारा सभागृहासमोर, गांजवे चौक, पुणे-30 येथे 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांच्या हस्ते व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार यावेळी उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ. संगीता बर्वे, मनोहर सोनवणे आणि मंजिरी बोन्द्रे यांनी काम पाहिले. असे कार्यवाह व दिवाळी अंक स्पर्धेचे समन्वयक वि. दा. पिंगळे यांनी कळविले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.