आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा"सनदी लेखापाल हा समाजाचा आर्थिक शिक्षक असतो. धन कमावल्याने जीवनात यश मिळते, मात्र धनाच्या योग्य विनियोगातून जीवनाचे सार्थक होते. त्यामुळे सनदी लेखापालांनी धनाचा विनियोग चांगल्या मार्गाने करण्यासाठी मार्गदर्शन करावे," असे प्रतिपादन अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी केले.
सनदी लेखापाल म्हणून शैक्षणिक, सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रात 50 वर्षे पूर्तीबद्दल सीए (डॉ.) एस. बी. झावरे यांचा 'सीए (डॉ.) एस. बी. झावरे गौरव समिती'तर्फे जाहीर सत्कार करण्यात आला. तुळशीचा हार, ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती, मानपत्र असे सत्काराचे स्वरूप होते.
बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या कार्यक्रमावेळी माजी केंद्रीय मंत्री सीए सुरेश प्रभू, माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम, सौ. भारती झावरे, द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाचे (आयसीएआय) माजी अध्यक्ष सीए जयदीप शाह, सीए प्रफुल्ल छाजेड, सीए निलेश विकमसी, आप्पासाहेब कदम, गौरव समितीचे उपाध्यक्ष सीएमए डॉ. धनंजय जोशी, केंद्रीय समिती सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, सचिव सीए यशवंत कासार, खजिनदार सीए अभिषेक धामणे आदी उपस्थित होते.
स्वामी गोविंददेव गिरी म्हणाले, "दिवसरात्र शिक्षकाच्या भूमिकेत असलेल्या डॉ. झावरे यांनी पुस्तकी ज्ञानासोबत जीवनमूल्यांची, मानवतावादाची शिकवण दिली. स्वतःला सामान्य परिस्थितीतून घडवत 50 वर्षे दहा हजाराहून अधिक सीए घडवण्याचे कार्य त्यांनी धीरोदात्तपणे केले. शिक्षित-अशिक्षितांमधील दरी दूर करून सर्वानी एकत्रित प्रयत्न केल्यास भारतमाता विश्वगुरू बनेल. सनदी लेखापालांनी समाजाचे आर्थिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी काम करावे."
डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, "झावरे सर अत्यंत शिस्तप्रिय, प्रयोगशील शिक्षक आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव विद्यार्थ्यांवर पडतो. माझे वडील डॉ. पतंगराव कदम यांच्याशी चांगला स्नेह असल्याने आमचे कौटुंबिक संबंध आहेत. 'आयसीएआय'च्या माध्यमातून आर्थिक विकासाला गती देणारे उपक्रम त्यांनी राबवले. सशक्त मन शरीराचे स्वास्थ्य चांगले ठेवते, हा विचार त्यांनी दिला. त्यांच्या मार्गदर्शनात हजारो सीए घडले, ही अभिमानाची गोष्ट आहे."
सीए डॉ. एस. बी. झावरे म्हणाले, "खेड्यापाड्यातून येणाऱ्या मुला मुलींना सनदी लेखापाल होण्यासाठी मार्गदर्शन करता आले, हे भाग्य आहे. जीवनात परिपूर्ण होण्याचा विचार दिला. त्यातून विद्यार्थी घडले. तीन पिढ्यांना शिकवण्याची संधी मिळाल्याचा आनंद आहे. 'परफेक्ट'ची सप्तसुत्री अंगीकारावी. तुम्हा सगळ्यांकडून मिळालेले प्रेम, आदर हीच माझ्या जीवनाची शिदोरी आहे."
सीए सुरेश प्रभू यांनी अध्यक्षीय समारोप करताना डॉ. झावरे यांच्या कार्याचे कौतुक केले. डॉ. झावरे यांच्यामुळे देशाला चारित्र्यवान सनदी लेखापाल मिळाले. तसेच 'आयसीएआय'च्या विकासात त्यांचे योगदान मोलाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.