आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन:ध्येयाप्रति समर्पित व्यक्तिमत्त्व एक महान कर्मयोगी आपल्यातून निघून गेले, फडणवीसांनी वाहिली बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली

पुणे24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्रकथन अतिशय प्रभावीपणे करणारे महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यात आज सकाळी 5 वाजून 7 मिनिटांनी निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेब पुरंदरेंवर उपचार सुरू होते.

मात्र, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव पर्वती येथील त्यांच्या घरी सकाळी आठ वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून दुपारी बारा नंतर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

फडणवीस म्हणाले की, प्रख्यात शिवशाहीर, महाराष्ट्रभूषण, पद्मविभूषण, सिद्धहस्त लेखक बाबासाहेब पुरंदरे हे आज आपल्यातून निघून गेले. मनाला अतिशय वेदना होत आहेत आणि त्यांच्या आठवणी, त्यांच्या सहवासात घालविलेले क्षण डोळ्यापुढे येत आहेत. तब्बल तीन पिढ्यांना त्यांच्याकडून शिवचरित्र ऐकायला आणि वाचायला मिळाले, हे आमच्या पिढीचे भाग्यच म्हणावे लागेल.

नुकतेच त्यांचे 100 व्या वर्षात पदार्पण झाले, तेव्हा त्या सोहोळ्याला आभासी पद्धतीने उपस्थित राहण्याचा योग आला आणि आज ते आपल्यात नाहीत. विश्वासच बसत नाही. असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली.

बालपणापासून त्यांनी शिवचरित्र आणि शिवशौर्य सांगून बलशाली समाज घडविण्यात योगदान दिले. एक अमोघ व्यक्तिमत्त्व, ज्येष्ठ इतिहासकार, संशोधक त्यांच्या जाण्याने हरपला आहे. ‘राजा शिवछत्रपती’सारखा चरित्रात्मक ग्रंथ,‘जाणता राजा’ महानाट्य हा त्यांनी आपल्याला दिलेला फार मोठा आणि अमूल्य ठेवा आहे.

बाबासाहेबांची सर्वांत मोठी ओळख कोणती तर त्यांनी कधीही इतिहास मोडून-तोडून सांगितला नाही. त्यांनी इतिहासावर निस्सिम प्रेम केले, श्रद्धाही जोपासली. छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित प्रत्येक तारीख, प्रसंग मुखोदगत असलेले बाबासाहेब होते. शिवकाळ हाच त्यांचा श्वास आणि प्राण होता.

"ध्येयाप्रति समर्पित व्यक्तिमत्त्व, वेळ-शब्दांचे पक्के, सतत राष्ट्रनिर्माणाचा विचार, संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी कठोर परिश्रम असे बाबासाहेब पुरंदरे आता पुन्हा होणे शक्य नाही. एक महान कर्मयोगी आपल्यातून निघून गेले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! ॐ शांती!" असे ट्विट करत फडणवीसांनी श्रद्धांजली वाहिली.

छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक पुस्तके लिहिली
बाबासाहेब पुरंदरे यांचे मूळ नाव बळवंत मोरोपंत पुरंदरे होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक पुस्तके लिहिली आहेत आणि त्यांचे जीवन इतिहास आणि संशोधनासाठी समर्पित केले होते. 2019 मध्ये त्यांना भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण, आणि 2015 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

पद्मविभूषण पुरस्कार
भारत सरकारने पुरंदरे यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. 'जर 125 वर्षांचे आयुष्य मिळाले तर शिवचरित्र ब्रह्मांडाच्या पलीकडे घेऊन जाईल' असे बाबासाहेब पुरंदरे म्हणाले होते. मात्र वयाच्या शंभरीजवळच त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांचे संपुर्ण नाव बळवंत मोरोपंत पुरंदरे असे असून, त्यांचा जन्म 29 जुलै 1922 ला झाला. पण अवघा महाराष्ट्र त्यांना बाबासाहेब पुरंदरे याच नावाने ओळखतो.

बाबासाहेब पुरंदरे यांचे शिवचरित्राशी नाते अतूट होते. शिवाजी महाराजांच्या चरित्राचे अभ्यासक आणि संशोधक अशी त्यांची ओळख होती. त्यांच्याबद्दल जिव्हाळा वाटणारे लोक त्यांना "शिवशाहीर" म्हणतात. त्यांनी आतापर्यंत शिवचरित्राबरोबरच 50 हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. सात दशकांहून अधिक काळ त्यांनी शिवचरित्र लोकापर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले. पहिल्यांदा ते 1941 मध्ये भारत इतिहास संशोधक मंडळात आले होते.

बातम्या आणखी आहेत...