आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबासाहेब पुरंदरेंच्या लिखाणातून शिवरायांवर अन्याय:शरद पवारांचे वक्तव्य, म्हणाले - मला पुरंदरेंचे लिखाण कधीच पटले नाही

पुणे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवंगत बाबासाहेब पुरंदरेंची भाषणे, लिखाण, पुस्तके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर अन्याय केला. मला त्यांचे लिखाण कधीच पटले नाही, अशी भूमिका आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली.

पाखंडी इतिहास नको

श्रीमंत काेकाटे लिखित ‘शिवचरित्र आणि विचारप्रवाह’ या ग्रंथाचा प्रकाशन साेहळा आज पुण्यात पार पडला. यावेळी शरद पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यात रामदास यांचे याेगदान काय? दादाेजी काेंडदेवचे याेगदान काय? अशा अनेकजणांचे संबंध जाणीवपूर्वक जाेडले गेले. दादाेजी काेंडदेव व शिवाजी महाराजांचा काेणताही संबंध नव्हता. राजेंना दिशा देण्याचे काम जिजाऊ माता यांनी केले. इतिहासातील अनेक सत्य गाेष्टी अनेकांना न पटणाऱ्या आहेत. त्यामुळे मी खाेलात जात नाही. काेल्हापूरचे दिवगंत काॅ. गाेविंद पानसरे यांनी जे पुस्तक लिहिले त्यातून छत्रपतींच्या काळातील वास्तव समाेर आले. ते विसरता येणार नाही. सत्यावर आधारित नवा इतिहास नव्या पिढीला आपणास द्यायचा आहे. पाखंडी इतिहास नकाे.

संकुचित विचार मांडण्याचा प्रयत्न

पवार म्हणाले, शिवाजी महाराजांवरील लिखाणात आतापर्यंत काहीजणांनी सत्य तर काहींनी असत्य लिखाण केले. परंतु काेकाटे यांनी एकत्रितरित्या सत्य गाेष्टींचे लिखाण केले. देशात अनेक राजे हाेऊन गेले. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य हे जनतेचे राज्य हाेते. राज्य चालविण्याचा वेगळा दृष्टीकाेन राजेंनी मांडला. शेती, धर्म, न्याय आदी विषयक धाेरण कोकाटे यांच्या पुस्तकात मांडण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी रायगडवर महात्मा फुले यांनी शाेधून काढली. जमिनीशी बांधलकी असलेला कुलवाडीभूषण राजा असा उल्लेख त्यांनी केला हाेता. शिवछत्रपतींचा उल्लेख करताना काहीजणांनी अन्य धर्मियांशी संकुचित विचार मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु ताे खाेडून काढत उदाहरणासह पुस्तकात मांडण्यात आला.

महाराजांच्या कार्याचा अभ्यास करावा

कार्यक्रमात छत्रपती शाहू महाराजदेखील उपस्थित होते. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे कार्य केले ते महत्वाचे आहे. आज काळ असा आला आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा सर्वांनी अभ्यास केला पाहिजे. आपल्याला काेणती दिशा घ्याची हे समजत नसल्याने त्याबाबत चिंतन करावे. ज्यांच्या कार्यातून स्फुर्ती, दिशा मिळते त्यांची प्रेरणा घेऊन वाटचाल केली पाहिजे. अन्यायाविराेधात लढण्यासाठी राजेंनी जे काम केले ते पुढे सुरु राहिले पाहिजे. जनतेला जाे न्याय देताे ताेच राजा असताे. छत्रपती काेणत्या एका जाती, व्यक्तीचे नसून त्यांनी सर्व समाजासाठी काम केले. राज्यात जे परिवर्तन झाले ते चांगल्यासाठी की वाईटासाठी, हे माहिती नाही परंतु भविष्यात चांगले काम घडावे ही अपेक्षा आहे.

कार्यक्रमात डाॅ.जयसिंगराव पवार, डाॅ.पी.डी. जगताप, डाॅ. श्रध्दा कुंभाेजकर, चेंद्रखेर शिखरे, राजकुमार घाेगरे, श्रीमंत काेकाटे, राहूल पाेकळे उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...