आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Badamachi Puri And Jwari Noodles, Tambit kharvas Sweetness | Ajibai's 'Nutritional Diet Competition' Organized In Pune | Occasion Of Nutrition Diet Week

बदामाची पुरी अन् तंबीट-खरवसाची गोडी:पुण्यात रंगली आजीबाईंची ‘पौष्टिक आहार स्पर्धा’, पोषण आहार सप्ताहानिमित्त स्पर्धेचे आयोजन

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सफरचंदाची खीर, गवारीच्या पुर्‍या, बदामाची पुरी, ज्वारीचे नुडल्स, कुळीथ पिठाचे लाडू, पंढरपुरी डाळीचे तंबीट, बदामयुक्त खरवस, नारळाच्या दुधातील तांदळाच्या कुरडया आदी पारंपरिक, पौष्टिक आणि महाराष्ट्राच्या विविध प्रांतातील नावाजलेले खाद्यपदार्थ आजीबाईंनी आकर्षक स्वरूपात सादर केले.

राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डीईएस पूर्व प्राथमिक शाळेत या अनोख्या ‘पौष्टिक आहार स्पर्धे’चे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते.यावेळी दीडशेहून अधिक आजींनी या स्पर्धेत सहभाग घेतला आणि वेगवेगळे खाद्यपदार्थ सादर केले. पदार्थातील पोषणतत्त्व, पारंपरिकता, सादरीकरण, लागलेला वेळ आणि खर्च हे स्पर्धेसाठी निकष होते. डॉ. सायली पेंडसे, आहारतज्ज्ञ सायली पटवर्धन यांनी परीक्षण केले.

वसा नवीन पिढीकडे

बदलत्या जीवनशैलीत नवीन पिढीचा फास्टफूड कडे ओढा असल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. आपल्या पारंपरिक आहार पद्धतीत शरीराला आवश्यक असणारी पोषणतत्त्वे मिळतात. पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा वसा नवीन पिढीकडे संक्रमित व्हावा आणि आहार व आरोग्याविषयी समाजात जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती मुख्याध्यापिका माधुरी बर्वे यांनी दिली.

आरोग्यदायी जीवनशैलीसाठी

चांगले आरोग्य, मजबूत रोगप्रतिकार शक्ती आणि दीर्घकाळ निरोगी शरीरासाठी संतुलित आहार महत्त्वाचा असल्याचे मत डॉ. पेंडसे यांनी व्यक्त केले. शरीराला पोषण मिळावे, चवीचा कंटाळा येऊ नये आणि मानसिक स्वास्थ्य व चांगल्या आरोग्यदायी जीवनशैलीसाठी पारंपरिक, पोषणयुक्त आहार महत्त्वाचा असल्याचे मत पटवर्धन यांनी व्यक्त केले. यावेळी पारंपारिक आणि पौष्टिक विविध खाद्यपदार्थांची निर्मिती करण्यात आली होती.

पारंपारिक पदार्थांवर भर

सदर पौष्टिक खाद्य पदार्थ चाखून आजीबाई सुखावल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले. बदलत्या काळात, जंकफूड मोठ्या प्रमाणात वाढल्याने लहान-मोठी मुले पौष्टिक आहारापासून दुरावली असून त्यांना सकस आहार देण्यासाठी पारंपारिक पदार्थांवर भर दिला गेला पाहिजे असे मत यावेळी सहभागी झालेल्या आजींनी व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...