आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबारामतीच्या मोरगावमधील खासगी क्लासच्या विद्यार्थ्यांना सहलीसाठी घेऊन निघालेल्या बसचे ब्रेक अचानक फेल झाले. या बसमध्ये 34 विद्यार्थी होते. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला असून, सर्व विद्यार्थी सुखरूप आहेत. हा सर्व थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
पुणे जिल्ह्यातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. बारामतीच्या मोरगावमधील खासगी क्लासचे विद्यार्थी सहलीसाठी निघाले होते. या बसचे ब्रेक अचानक फेल झाले. यावेळी बसमध्ये एकूण 34 विद्यार्थी होते. वरंधघाट मार्गे रायगड किल्ल्यावर विद्यार्थी सहलीसाठी जात होते. मात्र रस्त्यातच अपघात होता होता राहिला.
चाकाखाली दगड लावला
पुण्याच्या भोरमधील चौपाटी परिसरात ही घटना घडली आहे. येथून ब बस (क्रमांक MH12 HC 9119) जात असताना बसचे ब्रेक अचानक फेल झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. चालकाने रस्त्यावरच्या नागरिकांना सावध केले. आणि थेट चालत्या बसमधून उडी मारली. चालत्या बसमधून उडी मारून चालकाने चाकाखाली दगड टाकून बस थांबवली. चाकाखाली दगड लावल्याने बस नियंत्रणात आली आणि मोठा अपघात टळला.
एअर पाईप फुटल्याने ब्रेक निकामी
चालकाने दाखवलेल्या या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळल्याने सर्वस्तरातून चालकावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. त्याचप्रमाणे हा सर्व थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. असेच याबाबत म्हटले जात आहे. एअर पाईप फुटल्याने हा ब्रेक निकामी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.