आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यपाल यांचे वादग्रस्त वक्तव्य प्रकरण:पुण्यात सर्वपक्षीय संघटनाकडून 13 डिसेंबर रोजी बंदची हाक

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंह काेश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी निषेध व्यक्त करण्यासाठी पुण्यातील सर्व पक्षीय संघटनांची बैठक बुधवारी एसएसपीएमएस शाळेचे मैदान येथे पार पडली. यावेळी सर्वानुमते दहा डिसेंबर राेजी पुणे शहरात सन्मान यात्रा तर 13 डिसेंबर राेजी पुणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, गुरवारी याप्रकरणी पिंपरी चिंचवड शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबत संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी संताेष शिंदे म्हणाले, सदर पुणे बंदचा निर्णय हा सर्व पक्षांनी एकत्रितरित्या घेतलेला असून. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत राज्यपाल यांनी महत्वपूर्ण पदावर असताना बेजाबदार वक्तव्य करणे चुकीचे हाेते. त्याबाबत अद्याप त्यांनी माफी मागितलेली नाही. त्यामुळे सदर राज्यपालांची हाकलपट्टी करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. सदर बंद मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गटासह विविध संघटना सहभागी हाेणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष आणि माजी महापौर प्रशांत जगताप म्हणाले, देशातील आणि राज्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्यपाल यांच्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणे ,त्यांचा चुकीचा इतिहास सांगणे, त्यांचा एकेरी उल्लेख करणे यात चढाओढ लागलेली दिसून येत आहे. या सर्वांना शहाणपण शिकवावे तसेच त्यांना योग्य ती समज द्यावी याकरीता 13 डिसेंबर रोजी आम्ही सर्व पक्ष बंदची हाक दिली आहे.

दहा डिसेंबर रोजी विद्रोही साहित्य संमेलनाची सन्मान यात्रा महात्मा फुले वाडा ते एसएसपीएमएस शाळेचे मैदान यादरम्यान आहे. यामध्येही सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. राज्यपाल यांनी छत्रपतींचा अवमान केल्यानंतरही केंद्राने अद्याप त्यांना पदावरून हाकलेले नसून त्यांची गच्छंती करावी अशी आमची मागणी आहे.

पुणे बंदच्या माध्यमातून दिल्लीचे तख्त हलवून केंद्र सरकारला जागे करून राज्यपालांबाबत ठोस भूमिका घेण्यास भाग पाडू. केंद्र सरकार आणि राज्य सरकार मधील मंत्री यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणार नाही, याबाबत त्यांना योग्य अशाप्रकारची समज या बंदच्या माध्यमातून देण्याचा निर्धार सर्वपक्षीय नेत्यांनी केलेला आहे.

बातम्या आणखी आहेत...