आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारौप्य महोत्सव साजरा करीत असलेल्या शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध कलाकारास स्व. राम कदम कलागौरव पुरस्कार प्रदान केला जातो. यंदाच्या वर्षी भजन सम्राट पद्मश्री अनुप जलोटा आणि प्रसिद्ध पार्श्वगायक जावेद अली यांना या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
शरद पवारांच्या हस्ते वितरण
प्रत्येकी एक लाख रुपये, शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे यंदाचे १४वे वर्ष आहे. येत्या 2 डिसेंबररोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. श्रेष्ठ संगीतकार राम कदम यांच्या नावाने शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे २००६ पासून राम कदम कलागौरव पुरस्काराने संगीत क्षेत्रातील विविध मान्यवरांना गौरविण्यात आले आहे.
जलोटांच्या गायनाची सुरुवात आकाशवाणीतून
ज्येष्ठ गायक, संगीतकार आणि अभिनेता अशी अनुप जलोटा यांची ओळख आहे. संगीत क्षेत्रात भजन प्रकारातील योगदानामुळे ते भजन सम्राट म्हणून नावलौकिकप्राप्त आहेत. कला प्रकारातील योगदानाबद्दल त्यांना केंद्र सरकारने २०१२ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. अनुप जलोटा यांचा जन्म नैनिताल (उत्तराखंड) येथील आहे. त्यांचे वडिल पुरुषोत्तमदास जलोटा हे प्रख्यात भजन गायक होते. अनुप जलोटा यांचे सांगीतिक शिक्षण लखनौच्या भातखंडे संगीत संस्थेत झाले असून त्यांची संगीत कारकिर्दीची सुरुवात आकाशवाणीमध्ये गायक म्हणून झाली. 'ऐसी लागी लगन', 'मैं नही माखन खायो', 'रंग दे चुनरिया', 'जग मे सुंदर है दो नाम', 'चदरिया झिनी रेझिनी', 'तुम चंदन हम पानी' या त्यांच्या आवजातील रचना प्रसिद्ध आहेत.
जावेद अली यांची कव्वाली गायक म्हणूनही ओळख
युवा पिढीतील सुप्रसिद्ध पार्श्वगायक जावेद अली यांचा जन्म दिल्ली येथे झाला. त्यांचे वडिल उस्ताद हमिद हुसेन हे लोकप्रिय कव्वाली गायक असल्याने जावेद यांची गायनाची तालिम बालवयातच सुरू झाली. जगप्रसिद्ध गझल गायक उस्ताद गुलाम अली यांचे जावेद यांना मार्गदर्शन लाभले आहे. उस्ताद गुलाम अली यांना श्रद्धांजली व त्यांचा सन्मान म्हणून जावेद यांनी आपले नाव जावेद हुसेन यावरून जावेद अली असे बदलले. हिंदीसह बंगाली, कन्नड, मल्याळम्, गुजराथी, मराठी, उडिया, तमिळ, उर्दू, तेलगु अशा विविध भाषांमधील चित्रपटांसाठी जावेद यांनी पार्श्वगायन केले आहे. तसेच कव्वाली गायक म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. 'एक दिन तेरी राहों में', 'जश्न ए-बहारन', 'अर्जियां' 'गुजारिश', 'आ जाओ मेरी तमन्ना' ही त्यांच्या आवाजातील चित्रपट गीते गाजली आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.