आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरेगाव भीमा शौर्य दिन:चंद्रकांत पाटलांनी विजय स्तंभास घरुनच केले अभिवादन, म्हणाले- शाईच काय छातीवर गोळ्याही झेलण्यास तयार

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरेगाव भीमा या ठिकाणी आज 205 वा शौर्य दिन साजरा होत आहे. शौर्य दिनानिमित्त विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून लाखो आंबेडकर अनुयायी पहाटेपासूनच याठिकाणी मोठी गर्दी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी हजारोंची गर्दी उसळली आहे. विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार आहेत.

कोरेगावला विजयस्तंभाच्या दर्शनास व अभिवादनास आलो तर पुन्हा शाई फेकू अशी धमकी मला देण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने चालण्यासाठी मी शाईच काय छातीवर गोळ्याही झेलण्यास तयार आहे, परंतु अशा घटनेतून दंगल घडवून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याची काहींची सुप्त इच्छा आहे.

त्याचा त्रास विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांना होऊ नये यासाठी आपण घरुनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि विजय स्तंभास अभिवादन करत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शौर्य दिनानिमित्त कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभाला घरूनच अभिवादन केले आहे. विजयस्तंभ परिसर विकासासाठी शासनाने घोषित केलेल्या 100 कोटी निधीची अंमलबजावणी करणार असल्याची माहिती यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिली.

कोरेगाव याठिकाणी 1 जानेवारी 1818 मध्ये इंग्रज आणि पेशव्यांमध्ये ऐतिहासिक लढाई झाली होती. महार समाजातील सैन्याच्या जोरावर इंग्रजांनी पेशवाईविरुद्ध युद्ध पुकारले. हे युद्ध इंग्रजांनी जिंकल्यानंतर त्यांनी या लढाईच्या स्मरणार्थ कोरेगाव भीमा येथे विजय स्तंभ बांधला. 1 जानेवारी 1927 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या विजय स्तंभास भेट देऊन हा इतिहास पुढे आणला. तेव्हापासून शौर्य दिनाची प्रथा सुरु झाली.

प्रकाश आंबेडकर यांनी कुटुंबासह विजयस्तंभाला भेट देत अभिवादन केले. यासोबतच राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे देखील अभिवादन करण्यासाठी येणार आहेत. तर मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, आमदार जितेंद्र आव्हाड हे नेतेही कोरेगाव भीमा या ठिकाणी येणार आहेत.

प्रशासनाकडून विजयस्तंभ परिसरात जोरदार तयारी करण्यात आली आहे. यंदाचा शौर्यदिन निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी जिल्हा प्रशासनही सज्ज आहे. अनुयायांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पुणे शहर पोलिस तसेच पुणे ग्रामीण पोलीसांकडून सर्व खबरदार घेतली जात आहे. याठिकाणी साडेचारहजार पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलाय.

बातम्या आणखी आहेत...