आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Bhoomipujan Of Registration And Stamp Building Pune | Inauguration Of E facilities By Deputy Chief Minister | Presence Of Political Leaders Of Various Parties

नोंदणी-मुद्रांक भवनाचे भूमिपूजन:ई-सुविधांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ, विविध पक्षीय राजकीय नेत्यांची राहणार उपस्थिती

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विधान भवनासमोरील प्रशासकीय इमारतीच्या परिसरात उभारण्यात येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक भवनाचे भूमिपूजन आणि मोबाईल अॅप, नवीन संकेतस्थळ तसेच इतर ई-सुविधांचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या (2 सप्टेंबर) होणार आहे.

या कार्यक्रमाला राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे.

अशी असेल नवीन इमारत

नोंदणी महानिरीक्षक यांचे कार्यालय सुरूवातीपासून पुण्यामध्ये कार्यरत आहे. 1991 पर्यंत बरॅकमध्ये, 1997 पर्यंत गव्हर्नमेंट फोटो रजिस्ट्री इमारतीत व त्यानंतर आजतागायत नविन प्रशासकीय इमारतीमध्ये हे कार्यालय कार्यरत आहे. कार्यालयाच्या कामकाजाचे स्वरूप पाहता या कार्यालयासाठी स्वतंत्र व प्रशस्त इमारतीची गरज होती.

135 अधिकारी व कर्मचाऱ्यांची व्यवस्था

त्यादृष्टीने नवीन 'नोंदणी व मुद्रांक भवन' बांधण्यात येणार आहे. या इमारतीत एकूण आठ मजले असणार असून साधारणतः 5 हजार चौ. मी. बांधीव क्षेत्र उपलब्ध होणार आहे. इमारतीमध्ये नोंदणी महानिरीक्षक यांच्या कार्यालयाबरोबरच विभागाची इतरही कार्यालये असणार आहेत. त्यामध्ये वर्ग-1 संवर्गातील 21 अधिकारी, वर्ग-2 संवर्गामध्ये 26 अधिकारी व वर्ग-3 संवर्गामध्ये 88 कर्मचारी असे एकूण 135 अधिकारी व कर्मचारी यांची बैठक व्यवस्था होणार आहे.

18 महिन्यांमध्ये काम

इमारत ही पर्यावरणपूरक असणार असून सभागृह, संगणक लॅब, ग्रंथालय, अभ्यागत कक्ष, उपहारगृह, अपंगांकरिता रॅम्प, आदी सुविधा असतील. प्रत्यक्ष बांधकाम 18 महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या नविन वास्तूमुळे कार्यालयाची कार्यक्षमता वाढणार आहे.

नवीन संकेतस्थळ आणि ई-सुविधा

नवीन संकेतस्थळासाठी अद्ययावत तंत्रज्ञान उपयोगात आणण्यात आले असून ते वापरकर्त्यासाठी अधिक सुलभ असणार आहे. या संकेतस्थळावर विभागाच्या आणखी काही सेवांच्या समावेशासह विभागाचे कामकाज, संबंधित अधिनियम व नियम यांची सर्वसमावेशक माहिती असणार आहे. संकेतस्थळावरील माहिती व मजकूर अद्ययावत करण्यासाठी व्यवस्थापन प्रणाली स्थापन करण्यात आली आहे.

संवादासाठी उपयुक्त माध्यम

एम-गव्हर्नन्ससाठी तयार करण्यात आलेले अत्याधुनिक मोबाईल एप्लिकेशन माहितीच्या प्रसाराची व्याप्ती वाढण्यासाठी उपयुक्त आहे. या अॅपमुळे कामकाजात मदत होण्यासोबत माहिती सहजपणे उपलब्ध होणार आहे. नागरिकांना आवश्यक सेवा आणि प्रक्रिया एका क्लिकवर उपलब्ध होणार असल्याने नागरिक व महसूल विभाग यांच्यामध्ये परस्पर संवादासाठी उपयुक्त माध्यम ठरणार आहे.

बातम्या आणखी आहेत...