आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीएचआर घोटाळा:झंवरने पोलिसांना गुंगारा देण्यासाठी दीडशे दिवसांत दीड हजार वेळा बदलले सिमकार्ड

पुणे / जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाईचंद हिराचंद रायसाेनी (बीएचआर) पतसंस्थेत आर्थिक गैरव्यवहार करत काेट्यवधी रुपयांची फसवणूक करून पसार झालेला मुख्य आराेपी सुनील देवकीनंदन झंवर (रा.जयनगर, जळगाव) यास नाशिक येथून पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. दोन महिन्यांपासून ताे पाेलिसांना गुंगारा देऊन विविध ठिकाणी स्थलांतर करत हाेता, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या पाेलिस उपायुक्त भाग्यश्री नवटक्के यांनी दिली. माजी मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय म्हणून झंवर याचे नाव चर्चेत आले हाेते. पतसंस्थेशी संबंधित मालमत्तेचा व पैशांचा गैरव्यवहार करण्याकरिता आराेपींनी संगनमताने बनावट वेबसाईट तयार केली. मागील तारखेत नाेंदी करता येणारे सॉफ्टवेअर बनवून कर्जदारांची कर्ज प्रकरणे बेकायदेशीररीत्या निरंक केली. झंवर व त्याच्या फर्मच्या नावे पतसंस्थेच्या मालमत्ता वर्ग करण्यात आल्या. पूर्ण माेबदला न देता ठेवीदारांच्या पावत्या ३० टक्क्यांनी विकत घेऊन त्यांच्या ७० टक्के रकमेचा व संस्थेच्या मालमत्तेचा अपहार करण्यात आला. संस्थेच्या मालमत्ता व ठेवी अत्यल्प दरात बेकायदेशीर वर्ग केल्याचे दाखवून व ठेवीदारांना पूर्ण रक्कम दिल्याच्या खाेट्या नाेंदी संस्थेच्या रेकाॅर्डला करण्यात आल्या होत्या. पोलिसांच्या तपासात गैरव्यवहाराची रक्कम ६१ काेटी ९० लाख ८८ हजार रुपयांपर्यंत पोहोचलेली आहे. याप्रकरणी एकूण १८ आराेपींना अटक करण्यात आली आहे.

झंवर इंदौरमध्ये असल्याची महिती पथकाला मिळाली होती. १० दिवसांपासून पथक तेथे तळ ठोकून होते. सोमवारी झंवरने एका तासासाठी त्याच्या मोबाइलमध्ये नवीन सिमकार्ड टाकले. पथकाला झंवर वापरत असलेल्या कारचीही माहिती मिळाली. पंचवटीत महालक्ष्मी थिएटरमागे त्याच्या नातलगाच्या बंगल्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त हाती लागले. तेव्हापासून पथकाने बंगल्याच्या सभाेवताली सापळा रचला. सकाळी ८ वाजेच्या सुमारात ताे गच्चीत येताच त्यास पथकातील दाेघांनी बघून त्याचे छायाचित्र काढून ताेच असल्याची वरिष्ठांकडून खात्री केली. पथकातील दाेघांनी त्यांच्या बंगल्यात प्रवेश केल्याचे झंवरला लक्षात येताच त्याने गॅलरीतून खाली उडी मारून तारेच्या कुंपणावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथकाने आधीच या सर्व ठिकाणी सापळा लावून ठेवल्याने ताे उडी मारताच त्यास ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

अहमदाबाद येथून आठ दिवसांपूर्वीच तो इंदौरला आला होता. माजी मंत्र्याच्या घरात झंवरचे वास्तव्य : मागील नऊ ते दहा महिन्यांपासून झंवर नाशिक, मुंबई, गुजरात, राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश अशा विविध ठिकाणी वेशांतर करून आणि सिमकार्ड बदलून फिरत होता. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक रवींद्र गवारी आणि हवालदार शिरीष गावडे त्याच्या मागावर होते. तांत्रिक माहितीचे विश्लेषण केले असता तो अहमदाबादमध्ये असल्याचे आणि मुलगा सूरज झंवरला भेटल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिस पथक तपासाला गेले. परंतु तो हाती लागला नाही. पोलिस इंदोरलाही पोहचले. तेथे एका माजी मंत्र्यांच्या घरात तो राहत असल्याचे निष्पन्न झाले.

वायफाय डाेंगल व माेबाइल लोकेशनवरून पकडला गेला
अटकेपासून बचावासाठी झंवरने पाच महिन्यात दीड हजारपेक्षा जास्त वेळा सिमकार्ड, माेबाइल, वायफाय डाेंगल बदलले. इंदौरमध्ये असताना दहा दिवसांपूर्वी एका तासासाठी त्याने मोबाइलमधील सिमकार्ड बदलले आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाला त्याचे वायफाय डाेंगल व माेबाइलचे लोकेशन मिळाले. त्यानंतर इंदौर ते नाशिक असा कारचा पाठलाग करून पथकाने त्याला मंगळवारी सकाळी १०.३० वाजता पंचवटी येथून ताब्यात घेतले.

झंवरच्या कार्यालयात मिळाले पुरावे
झंवरच्या जळगाव येथील कार्यालयावरील छाप्यातून पुणे आर्थिक गुन्हे शाखेला माेठया प्रमाणात कागदपत्रे व इलेक्ट्राॅनिक डाटा मिळाला. त्याचे विश्लेषण केले असता सुनील झंवर व त्याचा मुलगा सूरज झंवर यांच्या विराेधात सबळ पुरावे पाेलिसांना मिळाले आहेत. संगणकावरील डेटामध्ये ठेवीदार व कर्जदारांच्या याद्या व कर्ज निरंक दाखले आढळले. तसेच गुन्ह्यातील इतर आराेपींबाबतचे दस्तावेज आणि कर्ज प्रकरणात कशा प्रकारे तडजाेड केली गेली हे दिसून आले आहे.

पुणे न्यायालयात आज पेशी
बुधवारी झंवर याला पुण्याच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पुण्यातील सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र गवारी व पोलिस नाईक शिरीष गावडे या दोघांच्या पथकाने झंवर याचा पाठलाग करून त्याला अटक केली आहे.

बातम्या आणखी आहेत...