आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:खडकवासला चौपाटीजवळ कारच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू; पुण्यातील घटना

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सिंहगड रस्त्यावर खडकवासला धरण चौपाटी परिसरात भरधाव वेगात असलेल्या कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात सहप्रवासी तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नितीन भाऊसाहेब मुसमाडे (वय -32, रा. नऱ्हे,पुणे ) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. अपघातात सहप्रवासी राम गणपत राठोड (वय -27, रा. प्रतापगड हाॅस्टेल, नऱ्हे,पुणे) गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुचाकीस्वार मुसमाडे आणि राठोड शनिवारी पहाटे अडीचच्या सुमारास डोणजे परिसरातून पुण्याकडे निघाले होते. त्या वेळी भरधाव मोटारीने दुचाकीला धडक दिली. अपघातानंतर मोटारचालक डोणजे गावाकडे पसार झाला. रात्र गस्तीवर असणारे पोलीस उपनिरीक्षक डी. पी. शिंदे, महेंद्र चौधरी यांना अपघाताची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. अपघातात दुचाकीस्वार मुसमाडे याचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात मोटारचालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पसार झालेल्या मोटारचालकाचा शोध घेण्यात येत आहे.

दहा वर्षांच्या मुलाचा दुर्देवी मृत्यू

पुणे जिल्ह्यातील मावळातील कासारसाई धरणात बुडून आदर्श संतोष गायकवाड (रा. वैदुवाडी, हडपसर,पुणे) या दहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. तो कासारसाई धरण परिसरात मावशी पल्लवी साळवे हिच्यासह आला होता. पल्लवी आणि आदर्श पाण्यात खेळत होते. त्या वेळी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने आदर्श बुडाला. आदर्श बुडाल्याचे लक्षात आल्यानंतर पल्लवीने या घटनेची माहिती शिरगाव परंदवडी पोलीस चौकीला दिली. पोलीस उपनिरीक्षक बी. सी. गावित, हवालदार जाॅन पठारे, पोलीस नाईक पी. एम. खेडकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.

मावळातील वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि शिवदुर्ग मित्र लोणावळा या संस्थेतील जीवरक्षक नीलेश गराडे, भास्कर माळी, अविनाश कार्ले, विनय सावंत, अनिश गराडे, राजाराम केदारी आदींनी शोधमोहीम राबविली. पाण्यात बुडालेल्या आदर्शला बाहेर काढण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.