आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली, 108 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर उभी राहिलेली ही भूमी आहे. राज्याच्या बाहेरून आलेल्या राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांनी आपल्या भाजप प्रेमापोटी महाराष्ट्राचा अपमान केला आहे. महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राच्या मातीशी गद्दारी करणाऱ्या सूर्याजी पिसाळ उर्फ भगतसिंह कोश्यारी यांचा जाहिर निषेध करतो असे मत पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी शनिवारी व्यक्त केले.
भगतसिंह कोश्यारी हे शुक्रवारी मुंबईतील दाऊद बाग जंक्शन चौकाचे नामकरण व उद्घाटन सोहळ्यात म्हणाले, 'कधीकधी मी महाराष्ट्रात लोकांना सांगतो की, मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटले जाते. मात्र, गुजराती आणि राजस्थानी लोक येथून गेल्यास मुंबईला आर्थिक राजधानी म्हटले जाणार नाही.'
मतांचे धृवीकरण करण्यासाठी
अशा पद्धतीचे वक्तव्य हे निषेधार्थ आहे असे सांगत शिंदे म्हणाले, महाराष्ट्राच्या स्थापनेपासून मुंबईमध्ये गुजराती, राजस्थानी अनेक राज्यांतून आलेल्या सर्वांचे मराठी माणसाने मनमोकळेपणाने व मोठ्या मनाने स्वागत केले आहे. भाजपचे राज्यपाल फक्त मतांचे धृवीकरण करण्यासाठी असे वक्तव्य करतात. याचे आश्चर्य तर वाटतेच. परंतु भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील एकाही नेत्याला वाईट वाटू नये याची खंत आहे.
गुजराथी व राजस्थानी संघटनांनी विरोध करावा
याबद्दल येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील जनता तुम्हाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये 108 हुतात्म्यांवर कोणी गोळ्या चालविण्यास सांगितल्या हे महाराष्ट्र विसरलेले नाही. खरे तर गुजराथी व राजस्थानी संघटनांनी या वक्तव्याचे खंडण करायला हवे. असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध
राज्यपाल यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसने अलका टॉकीज चौकात राज्यपाल यांच्या विरोधात आक्रमक आंदोलन केले. राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी राज्यपाल यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत भाजपने सदर प्रकरणात योग्य ती भूमिका न घेतल्याने त्यांचाही निषेध व्यक्त केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.