आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधान परिषद निवडणूक:पक्षादेश पाळणं आमच्या रक्तात; पुण्यातील दोन्ही आजारी आमदार जिद्दीने पुन्हा मुंबईत

पुणे12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यसभा निवडणुकीनंतर विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी पुन्हा एकदा राज्यातील सर्व पक्ष सक्रिय झाले आहेत. भारतीय जनता पक्षाने राज्यसभा निवडणुकीत तिसरी जागा निवडून आणत स्वतःचं वर्चस्व सिद्ध केले. यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या आणि आजारी असूनही मतदानाला उपस्थित राहणाऱ्या पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप सोमवारी सकाळी मतदानासाठी पुन्हा एकदा मुंबईत पोहचले.

सोमवारी सकाळी सदर दोघे मतदानासाठी पुण्यातून मुंबईला पोहचले आहेत. यावेळी आमदार मुक्ता टिळक म्हणाल्या, सदर निवडणुकीत सर्व पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. पक्षाने दिलेला आदेश पाळायचे हे आमच्या रक्तात भिनलेले आहे. म्हणून मी मतदानाला जात आहे.

ममत्वाचा भाव

राज्यसभा निवडणुकीत सहावी जागा भाजपनं जिंकल्यानंतर पहिल्याच प्रतिक्रियेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी हा विजय आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार मुक्ता टिळक यांना समर्पित केला होता. याबाबत त्या म्हणाल्या की, फडणवीसांनी आम्हाला व्यक्तीशा फोन करून आभार मानले. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी देहू येथे कार्यक्रमासाठी आल्यानंतर सुद्धा त्यांनी आमच्या बाबतची माहिती पंतप्रधान यांना दिली. त्याचप्रमाणे मला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचाही फोन आला आणि त्यांनी तब्येतीची विचारपूस केली. त्यामुळे पक्षातील सर्व लोक आमची काळजी घेत असून ममत्वाचा भाव दिसून येत आहे.

अ‌ॅम्ब्युलन्स ते मतदान केंद्र

कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक कॅन्सरने पीडित असून, त्या मागीलवेळी पुण्यातून मुंबईला रवाना झाल्यावर त्यांना त्रास सुरु झाला होता. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करावे लागले. मात्र, दुसर्‍याच दिवशी मतदानासाठी त्या कार्डयिक ॲम्बुलन्समधून विधान भवनात दाखल झाल्या. त्याचप्रमाणे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप हे सुद्धा आजारी असून त्यांना चालतानाही अडचणी जाणवत असल्याने ते कार्डियाक रुग्णवाहिकेतून चिंचवड ते मुंबई प्रवास करून विधान भवनात दाखल झाले होते.

लक्ष्मण जगताप यांच्याविषयी

लक्ष्मण जगताप हे सध्या भाजपचे आमदार आहेत. पुण्यातल्या पिंपरी विधानसभा मतदारसंघावर त्यांची मजबूत पकड आहे. 1986 ते 2006 अशी सलग वीस वर्षे पिंपरी-चिंचवड पालिकेत ते नगरसेवक होते. तर 1993 ला ते स्थायी समिती अध्यक्ष, तर 2002 ला महापौर झाले होते. 2009 साली राष्ट्रवादीलाही राम राम ठोकला आणि अपक्ष म्हणून पिंपरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यात त्यांना विजय मिळवला. निकालानंतर मात्र त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पुनरागमन केलं. 2014 च्या लोकसभा निवडणुकीआधी त्यांनी राष्ट्रवादीशी काडीमोड घेतला. शेतकरी कामगार पक्षाकडून 2014 साली लोकसभा लढले. त्यावेळी त्यांचा शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंनी पराभव केला. लोकसभेतील पराभवानंतर जगतापांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि 2014 ची विधानसभा त्यांनी भाजपमधून लढवली. 2014 आणि 2019 अशा दोन्ही वेळा ते भाजपचे आमदार म्हणून विधानसभेत दाखल झाले आहेत.
मुक्ता टिळक यांच्याविषयी

मुक्ता टिळक या पुणे महापालिकेच्या माजी महापौर आहेत. त्या लोकमान्य टिळकांचे पणतू शैलेश टिळक यांच्या पत्नी आहेत. त्या कसबा विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या आमदार आहेत. पुणे महापालिकेत नगरसेविका म्हणून त्यांनी कार्य केले आहे. तर 2017 साली त्या महापौर झाल्या. 2019 साली विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आणि विजयीही झाल्या. सध्या त्या कर्करोगाशी झुंज देत आहेत.

बातम्या आणखी आहेत...