आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातमध्ये भाजपला निवडणुकीत यश:राज्यात जनादेश मिळाला तरच केंद्रात जनादेश मिळतो हे काँग्रेसने लक्षात घ्यावे - खा. सहस्त्रबुद्धे

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता पक्षाने गुजरातमध्ये अभूतपूर्व यश मिळवले असून काँग्रेसची 'भारत जोडो' यात्रा ही मतदारांनी 'काँग्रेस छोडो यात्रा' मध्ये परावर्तित केलेली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यात्रेत काही बोलले तरी मतदार त्यांना प्रतिसाद देत नसल्याचे दिसून येते व राज्यात जनादेश मिळाला तरच केंद्रात जनादेश मिळतो ही बाब काँग्रेसने लक्षात घ्यावी. असा टोला भारतीय जनता पक्षाचे खासदार विनायक सहस्त्रबुद्धे यांनी गुरुवारी बोलताना लगावला.

गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाला निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्ष पुणे शहर कार्यालय जवळ एकत्रित येत विजयाचा आनंद साजरा केला. यावेळी पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, राघवेंद्र मानकर ,प्रमोद कोढरे ,धनंजय जाधव यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

काय म्हणाले सहस्त्रबुद्धे?

सहस्त्रबुद्धे म्हणाले, आजचा विजय भाजपचा ऐतिहासिक विजय असून आगामी काळात राजकारणाची दिशा कोणत्या बाजूला आहे ही बाब स्पष्ट करणारा हा निकाल आहे. पश्चिम बंगालमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची सलग तीस वर्ष सत्ता दडपशाहीवर होती. मात्र, भाजपची गुजरात मधील दीर्घकाळ सत्ता सुशासनावर प्रस्थापित असल्याचे दिसून येत आहे. 2024 मध्ये देशात पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप सत्तेत येईल.

गुजरातमध्ये सलग 27 वर्ष भाजपची सत्ता

पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले, गुजरातमध्ये सलग 27 वर्ष भाजपची सत्ता आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा गुजरात मध्ये अद्याप मोठ्या प्रमाणात टिकून असल्याचे अभूतपूर्व यशातून दिसून येते. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह असंख्य भाजप कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो. गुजरात मधील रेकॉर्ड ब्रेक विजयामुळे देशभरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक पक्ष गुजरातमध्ये एकत्रित येत त्यांनी भाजप विरोधात खोटा प्रचार केला परंतु त्या जनता बळी पडली नाही. त्यामुळे हा निकाल विरोधकांना चपराक देणारा आहे. काँग्रेस नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचेही या निकालातून स्पष्ट होत आहे.

बातम्या आणखी आहेत...