आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून भाजप आक्रमक झाला आहे. आज पुण्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करत कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा झेंडा जाळला.
राज्यभरात कार्यकर्ते रस्त्यावर
यावेळी माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि RSS विरोधात जी आक्षेपार्ह वक्तव्य केली आहेत. त्याचा निषेथ करण्यासाठी आज राज्यभरात 1200 ठिकाणी भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत.
आज अलका टॉकीज चौक येथील निषेध आंदोलनात भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, प्रदेश सरचिटणीस आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, राजेश पांडे, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, राजेश पांडे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
भुट्टोंपर्यंत जोडे जात नाहीत
आंदोलनादरम्यान बावनकुळे म्हणाले की, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करत आहोत. युग पुरुष असलेल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगाने मान्यता दिली आहे. त्यामुळे पाकिस्तानला आता भारतात येऊन बॉम्ब स्फोट करता येत नाही. अतिरेक्यांना पाठिंबा देता येत नाही. भारतात दहशतवादी कारवाया करता येत नाही. पाकिस्तान हतबल झालाला आहे. भारतीय संस्कृती जगात नेण्याचे काम पंतप्रधान करत असून त्याबाबत पाकिस्तानला अडचण वाटत आहे. भुट्टो यांच्यापर्यंत आमचे जोडे पोहचत नाही, हे दुःख आहे. पाकिस्तानची घरात शिरून मारू, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
महामोर्चा ही मविआची नौटंकी
यावेळी महाविकास आघाडीच्या महामोर्चावरही चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली. बावनकुळे म्हणाले, ज्यांनी कधी राज्याला विकासाचा अजेंडा दिला नाही, अशा महाविकास आघाडीचे हे आंदोलन आहे. सध्या राज्यात बुलेट सारखी विकास एक्स्प्रेस निघाली आहे. त्यामुळे आघाडीमधील नेते अस्वस्थ आहे. भाजपने महापुरुषांबाबतच्या आक्षेपार्ह वक्तव्याचे कधीही समर्थन केले नाही.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, महापुरषांच्या नावाने फोटो लावून राज्यात सत्ता पुन्हा मिळाणार नाही म्हणून महाविकास आघाडीचे नेते घाबरले आहेत. आगामी विधानसभा निवडणूक जवळ असून त्यात आम्ही महाविकास आघाडीला जोरदार धक्का देवू. हे सरकार टिकले तर आम्ही संपून जाऊ, अशी भीती आघाडीमधील नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे त्यांचा मोर्चा ढोंगी आणि नौटंकी आहे.
मविआनेही निषेध करावा
आंदोलनात सहभागी भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या, दहशतवाद अड्डा असलेला पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करतात, ही बाब लाजिरवाणी गोष्ट आहे. हे घटनात्मक पद असून त्याचा निषेध महविकास आघाडीमधील नेत्यांनी केला पाहिजे. देशभरात या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी यांचा अपमान देश सहन करणार नाही.
अन्यथा पाकिस्तान शिल्लक राहणार नाही
युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील म्हणाले की, देशाची अस्मिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला आहे. पाकिस्तान सध्या लयास जात असून त्याची आर्थिक स्थिती मोडकळीस आली आहे. यापूर्वी पाकिस्तानने अतिरेकी कारवाई केली आहे. परंतु आता नवीन भारताचे नेतृत्व पंतप्रधान मोदी यांच्या हाती आहे. पुलवामा उदाहरण आहे की, पाकिस्तानमध्ये शिरून त्यांना धडा शिकवला आहे. युद्ध झाले तर पाकिस्तान जगाच्या नकाशावर दिसणार नाही. त्यांनी आपल्या देशाची काळजी करावी की, ते जगात राहणार की नाही. भारताच्या नादी लागू नये. अन्यथा ते शिल्लक राहणार नाहीत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.