आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत पुणे जिल्ह्यातील कॉंग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ता स्थानांना सुरुंग लावणार, असा निर्धार भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. भाजप पुणे जिल्हा कार्यकारिणीची बैठक शनिवारी हंडेवाडी येथे पार पडली. या बैठकीत चंद्रकांत पाटील बोलत होते. तसेच, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत निवडणुकीसाठी सर्वांनी कामाला लागण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.
कार्यकर्त्यांनी कामाला लावावे
पाटील म्हणाले की, 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर विश्वासघाताने सरकार गेले आणि महाविकास आघाडीचे खुनशी सरकार अस्तित्वात आले. त्यातच कोविडची साथ आली. या काळात महाविकास आघाडी सरकारकडून भाजप कार्यकर्त्यांवर अनन्वित अत्याचार झाले. पण परमेश्वर कृपेने आता कोविडची साथ नियंत्रणात आली. आपले सरकारही आले आहे. त्यामुळे सर्वांनी कसून कामाला लागावे. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्ह्यातील कॉंग्रेस -राष्ट्रवादीच्या सत्तास्थानांना सुरूंग लावून, त्यांची मक्तेदारी मोडीत काढू.
शरद पवारांना माघार घ्यावी लागली
पाटीळ म्हणाले की, विधानसभा निवडणुकीवेळी मला कोल्हापूरऐवजी पुण्यातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. अनेकांनी विविध तर्कवितर्क देखील लढवले. पण पक्ष नेतृत्वाने मला जे मिशन दिलं, त्यानुसार मी कामाला लागलो. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही संघटनेच्या आदेशानुसार बारामती आणि माढा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे पराभवाचा अंदाज आल्यानंतर माढा मतदारसंघातून शरद पवार यांना माघार घ्यावी लागली. अजूनही हे मिशन संपलेलं नाही. आगामी लोकसभापूर्वी ज्या-ज्या निवडणुका येतील, त्या भाजपने ताकदीने लढवायच्या आहेत.
स्थानिक निवडणुकांकडे लक्ष
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पंचायत निवडणुकीसंदर्भात पाटील म्हणाले की, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पंचायत निवडणुकीचे गण आणि गट जाहीर झाले आहेत. त्यामुळे सर्वांनी प्रदेश नेतृत्वाच्या आदेशानुसार कामाला लागावे. या निवडणुकीत कुठेही कमी पडता कामा नये.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.