आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:2024 च्या निवडणुकीत भाजप ‘सिंगल इंजिन’वर निवडून येईल : विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्षपदी कायम राहणार : फडणवीस

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात भेटीगाठी वाढत असून मुंबईसह राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप-मनसे युतीचे संकेत मिळत आहेत. मात्र, मेट्राेला ज्याप्रमाणे डबल इंजिन नसते त्याप्रमाणे सन २०२४ च्या निवडणुकीत भाजप ‘सिंगल इंजिन’वर निवडून येईल, अशा शब्दांत युतीची शक्यता विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळली असून दिल्लीवारीवर असलेले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेच प्रदेशाध्यक्षपदी राहणार असल्याचे ते म्हणाले.

काेकणातील पूरग्रस्तांना मदत साहित्य रवाना करण्यासाेबत विराेधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पुणे मेट्राेच्या कामाची शिवाजीनगर येथे पाहणी केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे एकीकडे मनसेच्या इंजिनसोबत युतीचे संकेत देत आहेत. त्यासाठी ते दिल्ली दौऱ्यावर पक्षश्रेष्ठींच्या भेटीगाठी घेत आहेत. दुसरीकडे पाटलांची उचलबांगडी करून वांद्र्याचे आमदार अॅड. आशिष शेलार यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती होणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. या सर्व घडामोडींवर फडणवीस यांना छेडले असता ते म्हणाले, दिल्लीतील भेटीगाठी या महाराष्ट्राच्या प्रश्नांवर असून पक्षात राज्यात काेणतेही संघटनात्मक बदल हाेणार नाहीत. केंद्रात नवीन मंत्रिमंडळ आले असून त्यांच्या भेटीगाठी तसेच महाराष्ट्राचे प्रश्न याकरिता भाजप नेते दिल्लीवारी सध्या करत आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील चांगले काम करत असून पक्ष त्यांच्या पाठीशी आहे. दिल्लीतील हायकमांडही त्यांच्या पाठीशी आहे, असे फडणवीस यांनी ठामपणे सांगितले.

जबाबदारीने परिपक्वता येते : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे राजकारणात प्रवेश करण्याबाबत चर्चा सुरू आहे यासंदर्भात फडणवीस म्हणाले, राजकारणात दुसरी पिढी प्रवेश करते ही बाब चांगली असून पक्षात परंपरेने त्यांचे नेतृत्व येत आहे, जबाबदारीने नवीन पिढीत परिपक्वता येऊ शकेल असे आपणास वाटत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

कंड्या पिकवू नका; फडणवीसांचा प्रसारमाध्यमांना सल्ला
मनसेसोबत युती आणि चंद्रकांत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदावरून उचलबांगडी या दोन्ही चर्चा फडणवीस यांनी फेटाळल्या. कृपया कंड्या पिकवू नका, पतंगबाजी करू नका तसेच चुकीच्या बातम्या करू नका, असा सल्लाही त्यांनी प्रसारमाध्यमांना दिला. विशेष म्हणजे चंद्रकांत पाटील हेच मनसेसोबत युतीचे संकेत देत असतानाच प्रदेशाध्यक्षपदावरून त्यांच्या उचलबांगडीची चर्चा सुरू झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...