आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Blessings Of Parents, Gurus, Love Of Fans Is My Shidori Senior Singer Dr. Prabha Atre; Special Felicitation For Padma Vibhushan Award

आईवडील, गुरुंचे आशीर्वाद, रसिकांचे प्रेम हीच माझी शिदोरी:ज्येष्ठ गायिका डाॅ. प्रभा अत्रे; पद्मविभूषण सन्मानाबद्दल विशेष सत्कार

पुणे21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आई-वडिल, गुरूंचे आशिर्वाद, रसिकांचे प्रेम-साथ लाभल्यानंतर एका कलाकाराला या पेक्षा काय आवश्यक आहे? माझ्या पुढील वाटचालीसाठी ही शिदोरी खूप आहे; मी भाग्यवान आहे, अशा भावना किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांनी रविवारी येथे व्यक्त केल्या.

माझ्या शिष्यांनी संगीताचा वारसा समर्थपणे पुढे न्यावा, ही एकच इच्छा आहे. आजच्या झगमगत्या दुनियेत कलाकारीपेक्षा कारागिरीला जास्त महत्त्व आले आहे. कलाकाराने या दीपवून टाकणाऱ्या वाटेकडे न जाता साधनेची वाट धरावी आणि स्वत:बरोबरच श्रोत्यांनाही दिव्य आनंदाची अनुभूती द्यावी, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.

किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांना मिळालेला पद्मविभूषण पुरस्कार आणि त्यांच्या 90व्या वाढदिवसानिमित्त स्वरावर्तन फाउंडेशनच्या संचालिका, डॉ. अत्रे यांच्या ज्येष्ठ शिष्या गायिका आरती ठाकूर-कुंडलकर आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌ यांच्यातर्फे विशेष सांगीतिक सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

डॉ. प्रभा अत्रे यांचा सत्कार विख्यात बासरीवादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरासिया यांच्या हस्ते करण्यात आला. पद्मश्री पंडित व्यंकटेशकुमार, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्त्रबुद्धे, डॉ. अत्रे यांच्या ज्येष्ठ शिष्या आरती ठाकूर-कुंडलकर, प्रसिद्ध हार्मोनियम वादक सुयोग कुंडलकर मंचावर होते.

डॉ. अत्रे पुढे म्हणाल्या, कलेने माणसातील माणूसपण जपले आहे हे आपण नेहमी लक्षात ठेवायला हवे. संगीताने माझ्या आयुष्याचे सोने केले आहे.

पंडित हरिप्रसाद चौरासिया म्हणाले, मी प्रभाजींच्या गायनाचा खूप जुना प्रेमी आहे. त्यांच्याप्रती माझ्या मनात खूप श्रद्धा आहे. संगीत क्षेत्रातील त्यांची मेहनत, तपस्या मी खूप जवळून पाहिली आहे. भारतीय संगीत देश-विदेशात पोहोचविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. रसिकांचे प्रेम त्यांना कायम मिळत राहो.

एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) म्हणाले, आजचा दिवस ऐतिहासिक आहे. ‘तारे जमीन पर' असा योग जुळून आला आहे. डॉ. प्रभा अत्रे यांच्या कार्याचा आढावा घेणारी चित्रफित दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद देशमुख यांनी केले.

सत्कार सोहळ्यानंतर किराणा घरण्याचे ज्येष्ठ गायक पंडित व्यंकटेशकुमार यांच्या शास्त्रीय गायनाची मैफल रंगली.

बातम्या आणखी आहेत...