आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिक्षक भरती घाेटाळा:चार हजार शिक्षकांची बोगस भरती; शिक्षक नेता शिरसाठ मुख्य सूत्रधार, 2011 पासून शिक्षक भरतीवर बंदी असूनही नियुक्त्या

पुणेएका महिन्यापूर्वीलेखक: मंगेश फल्ले
  • कॉपी लिंक

राज्यात २०११ नंतर शिक्षक भरतीवर बंदी असतानाही शिक्षण विभागातील अधिकारी आणि शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संगनमत करून बनावट कागदपत्रांच्या आधारे बेकायदा शिक्षक भरती केल्याचा गैरप्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात शिक्षक नेता असलेला मुख्याध्यापक संभाजी शिरसाठ याच्या बँक खात्यावर मागील तीन ते चार वर्षांत दाेन ते तीन काेटींचे बँक व्यवहार झाल्याचे पाेलिस तपासात निष्पन्न झाले आहे. शिरसाठ याच्यासह एकूण २८ जणांवर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. शिरसाठ हाच शिक्षक भरती घाेटाळ्यात मुख्य सूत्रधार असल्याचा संशय पाेलिसांना असून त्याची मालमत्ता जप्त करण्यात यावी याबाबतचा अर्ज पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पाेलिसांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) दिला आहे. एसीबीची मंजुरी मिळताच, शिरसाठ याच्या मालमत्ता जप्तीची कारवाई हाेणार असल्याचे संकेत वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

संभाजी शिरसाठ हा मुख्याध्यापक असताना त्याच्या बँक खात्यावर काेट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार झाले आहेत. त्याच्या वेगवेगळ्या बँक खात्यांत २० ते २५ लाख रुपये असल्याचे आढळले आहे. पाेलिसांनी त्याच्या मालमत्तेवरच टाच आणण्याच्या दिशेने कारवाई सुरू केली आहे. पाेलिसांनी शिरसाठच्या माेशी प्राधिकरण येथील तीन कार्यालये, चिखली, आळंदी, काळेवाडी आणि बंडगार्डन शाळेचे कार्यालय व संघटनेच्या कार्यालयावर छापेमारी करत महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली. या वेळी माेठ्या संख्येने बनावट शिक्के आणि शिक्षक भरती घाेटाळ्याचे दस्तऐवज पोलिसांना सापडले आहेत. शिक्षक भरतीस २०१२ पासून बंदी असताना, शिरसाठ याच्या पुढाकाराने शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी संगनमत करून बनावट शिक्के आणि कागदपत्रांचा वापर करून २०१२ पूर्वीच्या तारखांची नियुक्तिपत्रे देत अनुदानित पदांवर शिक्षकांची विविध शाळांत भरती केली. याकरिता प्रत्येक शिक्षकाकडून १० ते १२ लाख रुपये घेण्यात आल्याचे पाेलिस तपासात समाेर आले आहे. या प्रकरणात पुण्यातील समर्थ पाेलिस ठाणे आणि बंडगार्डन पाेलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. शिक्षक संघटनेचा पदाधिकारी असलेल्या शिरसाठ याने शिपाई व लिपिक यांच्या बनावट मान्यता तयार करून, त्या खऱ्या असल्याचे भासवून जून ते सप्टेंबर २०१६ दरम्यान वेतन देयके वेतन पथक (प्राथमिक) यांच्याकडे सादर केली. वेतनापाेटी शासनाची दीड लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची तक्रारही पाेलिसांत करण्यात आली आहे.

अटकपूर्व जामीन फेटाळला
शिक्षकांच्या बेकायदेशीर भरती प्रकरणातील मुख्य सूत्रधार संभाजी शिरसाठ, सरकारी अधिकारी, संस्थाचालक आणि शिक्षक अशा एकूण २८ जणांचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायाधीश एस.आर.नावंदर यांनी फेटाळला. तत्कालीन शिक्षण मंडळाचे शिक्षणप्रमुख रामचंद्र जाधव, तत्कालीन प्रभारी शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी दत्तात्रय शेंडकर, पिंपरी-चिंचवड मनपाच्या प्रशासकीय अधिकारी ज्योस्त्ना शिंदे आणि गोविंदराव दाभाडे यांच्यासह २८ जणांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे. याप्रकरणी सरकारतर्फे विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी बाजू मांडली.

बोगस भरती, तपास सुरू
शिक्षक भरती घाेटाळा प्रकरणात संभाजी शिरसाठ याची भूमिका प्रमुख असल्याचे तपासात समाेर आले आहे. अनेक शिक्षकांची अनुदानित पदावर लाखाे रुपये घेऊन बेकायदेशीर नियुक्ती करण्यात आली. या प्रकरणात चार हजारांपेक्षा अधिक शिक्षकांची भरती प्रक्रियाची चाैकशी सुरू आहे. ही संख्या वाढू शकते. काेट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार यात झाला असल्याने सखाेल तपास सुरू आहे. -डाॅ.शिवाजी पवार, सहायक पाेलिस आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा

ऑक्टोबर २०१९ मध्ये फिर्याद
आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजी पवार आणि त्यांची टीमने या प्रकरणाचा तपास करून बोगस शिक्षक भरती गैरव्यवहार आणि सरकारी तिजोरीची लूट समोर आणली. याप्रकरणी ऑक्टोबर २०१९ मध्ये जिल्हा परिषदेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांच्या आदेशान्वये पुणे जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी (शिक्षण) किसन दत्तोबा भुजबळ यांनी बंडगार्डन पोलिसात फिर्याद दिली होती. त्यानुसार भारतीय दंड संहितेतील फसवणूक, कट रचणे तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल आहे.