आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात व्यावसायिकाला 1.34 कोटींचा गंडवले:खासगी वित्तीय संस्थेची शाखा सुरू करण्याचे दाखवले आमिष

पुणे16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खासगी वित्तीय संस्थेची शाखा सुरू करण्याच्या आमिषाने पुण्यातील एका व्यावसायिकाची एक कोटी ३४ लाख ५४ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला आहे.

या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी याकुबअली ख्वाजा अहमद उर्फ याका (वय ४६, रा. हैद्राबाद, तेलंगणा) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत लष्कर भागातील एका व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. आरोपी याकुबअलीने झायसोल इंटीग्रेटेड सोल्यूशन्स प्रा. लि. या खासगी वित्तीय संस्थेचे पुण्यात कार्यालय सुरू करायची आहे. वित्तीय संस्थेच्या कार्यालयासाठी जागा हवी आहे तसेच वित्तीय संस्थेचे कार्यालय सुरू करण्यास मदत करतो, असे आमिष त्याने व्यावसायिकाला दाखविले होते. वित्तीय संस्थेकडून कर्ज पुरवठा केला जात असून या व्यवसायात मोठा नफा मिळतो, असेही आमिष त्याने दाखविले होते.

व्यावसायिकाने याकुबअलीला वेळोवेेळी एक कोटी ३४ लाख ५४ हजार रुपये दिले. पैसे दिल्यानंतर त्यांना परतावा देण्यात आला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.

दमदाटी करुन रिक्षा चोरुन नेली

रिक्षाचालकाला दमदाटी करुन सराइत गुन्हेगारांनी रिक्षा चोरुन नेल्याची घटना भवानी पेठेत घडली. या प्रकरणी दोन सराइत गुन्हेगारांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिरोज उर्फ बब्बाली मकबूल खान (वय ४९, रा. भवानी पेठ), इमरान मेमन (वय ५०) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत राजू डेव्हीड (वय ६०, रा. भवानी पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खान आणि मेमन सराइत गुन्हेगार आहे. कारागृहात असलेला खान जामीन मिळवून नुकताच बाहेर आला आहे.

आरोपी आणि रिक्षाचालक डेव्हीड ओळखीचे आहेत. भवान पेठेतील निशात चित्रपटगृहाजवळ रिक्षाचालक डेव्हीड थांबले होते. त्या वेळी आरोपी खान आणि मेमन तेथे आले. डेव्हीड यांना दमदाटी करुन आरोपी रिक्षा घेऊन पसार झाले. डेव्हीड यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...