आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Shinde And Fadanvis Govt |Maharashtra Politics Update | Cabinet Expansion Will Be Scheduled After Today's Hearing In The Supreme Court

16 आमदारांबाबत आज सुनावणी:सुप्रीम कोर्टात आजच्या सुनावणीनंतर ठरणार 'शिंदे सरकार'च्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त

पुणे8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात शिंदे सरकार स्थापन होऊन ३२ दिवसांचा कालावधी होऊन गेल्यानंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच राज्याचा गाडा हाकत आहेत. विरोधक विस्तारावरून सरकारवर टीका करत असतानाच शिंदे यांनी लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येईल, असे मंगळवारी पुण्यात स्पष्ट केले. मात्र, बुधवारच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीनंतरच विस्तार होईल, असे सांगण्यात येत आहे.

माझ्या नावाने काहीही सुरू करू नका; कार्यकर्त्यांना आवाहन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंगळवारी पुण्यात विविध कार्यक्रम पार पडले. शिंदे म्हणाले, आम्ही सध्या खूप काम करत असून जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेत आहोत. सरकार व्यवस्थित काम करत असून लवकरच मंत्रिमंडळ विस्तारही करण्यात येईल. आम्ही जी भूमिका घेतली त्याचे स्वागत जनतेने केले असून ते आम्हाला समर्थन देत आहेत. अतिवृष्टीमुळे जी जीवित आणि वित्तहानी झाली आहे. पीक नुकसानीबाबतही आढावा घेण्यात आला. छत्रपती संभाजी महाराज समाधी विकास आराखड्यास कोणतीही स्थगिती देण्यात आली नाही. भीमाशंकर येथील विकासकामे उत्तम दर्जाची करावीत, अशा सूचनाही त्यांनी या वेळी केल्या.

त्यांच्या घरी जाऊन माझेच नाव कशाला लिहू

संजय राऊत यांच्या घरी १० लाख रुपये आढळले. याबाबत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पैसे माझ्या घरी आढळले नाहीत. त्यांच्या घरी जाऊन मी माझेच नाव कशाला लिहीन? पुण्यातील उद्यानाबाबत ते म्हणाले, प्रेमापोटी कुणी काही करत असेल तर त्याबाबत मी काही करू शकत नाही. आनंद दिघे यांच्या नावाने ते उद्यान असल्याची मला माहिती असून माझ्या नावाने काही करू नये, असेही शिंदे यांनी या वेळी सांगितले.

सोळा आमदारांबाबत आज सुनावणी

बुधवारी (३ ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुनावणी आहे. यावर लगेचच निर्णय येईल असे नाही. मात्र, एकूणच न्यायालयाचा कल कळेल, अशी शिंदे गटाला आशा आहे. त्यामुळे रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार शनिवारपर्यंत (६ ऑगस्ट) मार्गी लागेल, असे शिंदे गटातील आमदार सांगत आहेत. राज्य मंत्रिमंडळ विस्तार गुजरात पॅटर्नप्रमाणे होईल, अशीही चर्चा आहे.

त्यांना दिल्लीतून ग्रीन सिग्नल नाही : अजित पवार : एक महिना उलटला तरी मंत्रिमंडळ विस्तार नाही. त्यांना दिल्लीतून सिग्नल मिळत नाही की त्यांच्याकडे आमदार संख्या वाढल्याने विस्तार होत नाही, असा चिमटा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काढला. “मुख्यमंत्र्यांकडे सर्व खात्यांचे अधिकार आहेत. उपमुख्यमंत्र्यांना खाते नाही. प्रत्येक फाइल मुख्यमंत्र्यांकडे जात आहे. मात्र सहीअभावी फायली थांबल्या आहेत. सह्या करायला मुख्यमंत्र्यांना वेळच नाही. उपमुख्यमंत्र्यांना अधिकारच दिलेला नाही,’ अशी टीका पवार यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...