आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारामती म्हणजे अमेठी नव्हे:शरद पवारांच्या अभेद्य बालेकिल्ल्यात कमळ फुलवणे भाजपसाठी सर्वात कठीण, वाचा काय म्हणतात तज्ज्ञ

पुणे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारामती म्हणजे अमेठी नव्हे. पुढील लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी देशातील सर्वात कठीण मतदारसंघ बारामती आहे, अशी प्रतिक्रिया भाजपच्या 'मिशन बारामती'वर राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केल्या आहेत.

मागील लोकसभा निवडणुकीत अमेठीत राहुल गांधींचा पराभव करत भाजपने अमेठीतील गांधी कुटुंबाची मक्तेदारी मोडीत काढली. त्यानंतर आता बारामतीतील शरद पवारांची मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी भाजपने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन गेल्या दोन दिवसांपासून बारामती दौऱ्यावर असून या मतदारसंघात त्यांनी कमळ फुलवण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावर राजकीय घडामोडींचे विश्लेषक विजय चौरमारे म्हणाले, अमेठीसोबत बारामतीची तुलना करणे पूर्णपणे चुकीचे ठरणार आहे. कारण कित्येक वर्षे गांधी कुटुंबाची येथे सत्ता असूनही अमेठीचा विकास झाला नाही, हे वास्तव आहेत. 2014 लोकसभा निवडणुकीत अमेठीत भाजपच्या स्मृती इराणी यांचा राहुल गांधींनी पराभव केला. तरीही इराणींनी या मतदारसंघात संपर्क वाढवत नेला. याऊलट राहुल गांधींनी सामान्यांशी तेवढा संपर्क ठेवला नाही. त्यामुळेच 2019च्या निवडणुकीत राहुल गांधींना याचा फटका बसला. मात्र, बारामतीचे तसे नाही.

सुप्रिया सुळेंचा दांडगा जनसंपर्क

विजय चौरमारे म्हणाले, शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे सध्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. शरद पवार किंवा अजित पवार यांच्या कामांमुळेच सुप्रिया सुळे जिंकतात, असे अनेकांना वाटते. मात्र, तसे म्हणणे पूर्णपणे खरे नाही. अर्थात शरद पवारांची पुण्याई असली तरी एखाद्या आमदाराचा आपल्या मतदारसंघात जनसंपर्क नसेल तेवढा जनसंपर्क सुप्रिया सुळे यांचा बारामतीत आहे. सुप्रिया सुळे दिल्लीत नसतात तेव्हा फक्त बारामतीत असतात. याशिवाय शरद पवार, अजित पवार व आता सुप्रिया सुळे हेच बारामतीच्या विकासाचे केंद्रबिंदू राहिले आहेत. पवार कुटुंबीयांनी बारामतीचा कायापालट केला असे मत केवळ सामान्यांमध्येच नाही तर विरोधकही हे खासगीत मान्य करतात. जनसंपर्क आणि विकास या दोन्ही बाजू सुप्रिया सुळेंच्या पारड्यात जातात. त्यामुळे येथे अमेठीप्रमाणे येथे विजय मिळवणे, भाजपला वाटते तेवढे सोपे निश्चितच नाही.

भाजपचे मिशन बारामतीच का?

विजय चौरमारे यांनी सांगितले की, आतापर्यंत ज्या मतदारसंघात विजय मिळवला नाही तेथे विजय मिळवणे हे पुढील निवडणुकीत भाजपचे लक्ष्य आहे. त्यात वावगे काही नाही. देशात बारामती जिंकण्यासाठी सर्वात कठिण असला तरी यामुळे बारामतीमधील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करता येते. तसेच, सतत प्रसिद्धीतही राहता येते.

दुसरे कारण म्हणजे, शरद पवार, अजित पवार यांना बारामतीमध्येच गुंतवून ठेवायचे, अशी खेळीही भाजपची असू शकते. राष्ट्रीय पातळीवर भाजप विरोधातील इतर सर्व पक्ष यांनी एकत्रित मूठ बांधण्याचा प्रयत्न केला आहे.शरद पवार यांनी देखील भाजपविरोधी सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. शरद पवार यांच्या पाठीशी सर्वच राजकीय पक्ष एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी भाजपला धोका संभवतो. त्यामुळे शरद पवार यांना त्यांच्याच मतदारसंघात अडकवण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे म्हटले जात आहे.

वास्तविक बारामती मतदारसंघात शरद पवार हे स्वतः निवडणूक लढवत नाही. तर त्यांची मुलगी सुप्रिया सुळे या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात. असे असले तरी बारामती मधील राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव हा शरद पवार यांच्या जिव्हारी लागू शकतो. या पार्श्वभूमीवर ही खेळी भाजपच्या वतीने खेळली जात आहे.

त्यामुळे बारमतीत पुढील लोकसभा निवडणूक ही थेट भाजप व शरद पवारांविरोधात होणार असे चित्र आहे. एकीकडे केंद्रात सत्ता, पंतप्रधान मोदींचा प्रभाव, चाणाक्ष शहांची रणनिती आणि दुसरीकडे शरद पवार आणि बारामतीत त्यांनी केलेली कामे, संस्था, कार्यकर्त्यांचे विणलेले जाळे यांच्यामध्ये ही लढत असणार आहे. या लढाईत कोण बाजी मारणार? बारामतीत पवार कुटुंबाचे वर्चस्व नेमके कसे आहे, हे जाणून घेऊया

अपराजित शरद पवार

शरद पवार सर्वप्रथम 1967च्या राज्य विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून विजयी झाले. त्यावेळी शरद पवारांचे वय अवघे 27 वर्षे होते. या निवडणुकीनंतरच मंत्रिमंडळात त्यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आला होता. त्यानंतर झालेल्या 1972 आणि 1978 च्या निवडणुकीतही शरद पवार विजयी झाले. त्यानंतर शरद पवारांनी 1984 मध्ये प्रथम लोकसभेची निवडणूकही बारामती लोकसभा मतदारसंघातून लढवली व जिंकली. त्यानंतर 1991, 1996, 1998, 1999 आणि 2004 अशा सलग चार निवडणुकांमध्ये शरद पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते.

बारामतीत पवारांच्या संस्थांचे जाळे

गेल्या 49 वर्षांपासून बारामतीच्या विकासाचे केंद्र हे शरद पवार हेच राहिले आहेत. बारामतीत शरद पवारांनी अनेक संस्थांची निर्मितीही केली आहे. यातील सर्वात महत्त्वाची संस्था म्हणजे बारामती कृषिविकास संस्था. या संस्थेद्वारे शेतीमाल, द्राक्ष परदेशात निर्यात केली जातात. जगातील मोठ्या साखळी खाद्यगृहांना इथून चीज पुरवलं जातं. तसेच, याच संस्थेद्वारे पूर्व प्राथमिक व प्राथमिक शिक्षणासाठी शारदाबाई पवार विद्या मंदिर, माध्यमिक शिक्षणासाठी शारदाबाई पवार विद्यानिकेतन, आर्ट्स कॉमर्स आणि सायन्ससाठी शारदाबाई पवार महिला कनिष्ठ महाविद्यालय, बीए, बीएस्सी आणि बीकॉम साठी शारदाबाई पवार महिला पदवी महाविद्यालय, बीएडसाठी शारदाबाई पवार महिला शैक्षणिक महाविद्यालय, शारदाबाई पवार महिला शैक्षणिक कनिष्ठ महाविद्यालय, शारदाबाई पवार शारीरिक शिक्षणाचे महिला महाविद्यालय, शारदाबाई पवार महिला कलानिकेतन अशा विविध शैक्षणिक संस्था सुरु करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मतदारसंघातील सामान्य तसेच तरुणाईवर पवार कुटुंबाची घट्ट पकड आहे. यावर भाजप कशी मात करते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

सुप्रिया सुळेंचा पहिल्याच निवडणुकीत विक्रम

शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीला सामोरे न जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर 2009 च्या निवडणुकीत पहिल्यांदाच सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांच्यासमोर भाजपचे कांता नलावडे यांचे आव्हान होते. मात्र सुप्रिया सुळे यांनी विक्रमी 3 लाख 36 हजार 831 मताधिक्याने भाजप उमेदवाराचा पराभव केला होता. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना 4 लाख 87 हजार 827 तर भाजपचे नलावडे यांना 1 लाख 50 हजार 996 मते मिळाली होती. म्हणजेच तब्बल 45.88% मताधिक्यांनी सुप्रिया सुळे यांचा विजय झाला होता. 2009च्या लोकसभा निवडणुकीत हा एक विक्रमी विजय होता.

2014 च्या मोदी लाटेचा परिणाम

2014 लोकसभा निवडणुकीत देशात मोदी लाट दिसून आली होती. त्यामुळे देशातील सर्वच मतदारसंघात त्याचा परिणाम दिसून आला. बारामती लोकसभा मतदारसंघात देखील सुप्रिया सुळे यांच्या मतदानाच्या टक्केवारीत 17.58% ची घट झाली होती. सुप्रिया सुळे यांना 48.88% मते मिळाली म्हणजेच 5 लाख 21 हजार 565 मते घेऊन त्या विजयी झाल्या होत्या. त्यांचे प्रतिस्पर्धी महादेव जानकर यांना 4 लाख 51 हजार 843 मध्ये मिळाली होती. सुप्रिया सुळे यांचा 69 हजार 719 मताधिक्याने विजयी झाला होता.

2019मध्येही वर्चस्व कायम

2014 नंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेतही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून विक्रमी विजय मिळवला होता. त्या एक लाख 55 हजार 774 मताधिक्यांनी विजयी झाल्या होत्या. या निवडणुकीत त्यांना एकूण 6 लाख 86 हजार 714 मते मिळाली म्हणजेच एकूण मतदानाच्या 52.63% मतदान त्यांनी घेतले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेमध्ये त्यांच्या मतदानाच्या टक्केवारीत 3.72 टक्क्यांची वाढ दिसून आली होती. तर सुप्रिया सुळे यांच्या प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्षाच्या कांचन राहुल कुल यांना 5 लाख 30 हजार 914 मध्ये मिळाली.

कसा आहे बारामती मतदारसंघ

बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर आणि खडकवासला हे सहा विधानसभा क्षेत्र येतात. यातील दोन विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर दोन विधानसभा क्षेत्र काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आहेत. तर इतर दोन विधानसभा क्षेत्रावर भाजपचे आमदार आहेत.

बारामतीतील विधानसभा मतदारसंघ

गेल्या लोकसभा निवडणुकीत खडकवासला विधानसभा क्षेत्रातून सुप्रिया सुळे यांना सर्वात कमी मते मिळाली होती. याशिवाय दौंड विधानसभा मतदारसंघातही भाजपचे वर्चस्व आहे. यापार्श्वभूमीवर इतर विधानसभा क्षेत्रातही जनतेला आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी भापजकडून पूर्ण प्रयत्न केले जात आहे. त्यामुळेच खासदार सुप्रिया सुळे यांनीही आता आपल्या बारामती दौऱ्याची सुरुवात खडकवासलामधून केली आहे. खडकवासला येथे ते नागरिकांच्या भेटी घेत त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तर, भाजप एक-एक विधानसभा क्षेत्रात हातपाय पसरत थेट लोकसभा निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. आता यात भाजपला यश मिळणार की राष्ट्रवादीचा हा गड आणखी अभेद्य होणार, हे येत्या निवडणुकीतच समजणार आहे.

बातम्या आणखी आहेत...