आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोजवारा:डॉ.दाभोलकर, सतीश शेट्टी हत्येचा सीबीआयचा तपास संथगतीनेच, गुन्हे उकल करण्याऐेवजी ‘ क्लोज’ करण्यावर भर

पुणेएका वर्षापूर्वीलेखक: मंगेश फल्ले
  • कॉपी लिंक
  • अभिनेता सुशांतसिंह आत्महत्येप्रकरणी तपासासाठी सीबीआय पथक मुंबईत

हायप्रोफाइल आणि राजकीय-सामाजिकदृष्ट्या संवेदनशील गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास लवकरात लवकर तडीस नेण्याच्या दृष्टीने केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) देण्याची मागणी केली जाते. मात्र सीबीआयकडे केस वर्ग केल्यानंतर त्याचा तपास एक तर संथगतीने होतो किंवा संशयित, दोषींना शिक्षाच होत नसल्याचे दिसून आले आहे. सुशांतसिंह राजपूत प्रकरण सीबीआयकडे सोपवल्यानंतर राज्यातील काही गाजलेल्या आणि संवेदनशील गुन्ह्यांच्या तपासाचा ‘दिव्य मराठी’ने मागाेवा घेतला असता संबंधित व्यक्तींच्या कुटुंबीयांनी सीबीआय तपासावर नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, सीबीआयकडे आलेल्या केसचा तपास सखोल पद्धतीने केला जातो आणि सर्व कंगोरे तपासले जातात. मनुष्यबळ कमतरता आणि अनेक गुन्ह्यांचा तपास यामुळे त्यांना काही अडचणी येतात आणि तपास कामास उशीर होतो, असे सीबीआयचे माजी वकील अय्युब पठाण सांगितले.

तपास करण्यापेक्षा फाइल बंद करण्याकडे कल : माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांची सन २०१० मध्ये हत्या झाली. त्यानंतर दोन महिन्यांत तपास सीबीआयकडे वर्ग झाला. पाच वर्षांनंतर सीबीआयने न्यायालयात ‘क्लोजर रिपोर्ट’ दाखल केला. केसबाबत अनेक पुरावे सादर केल्यानंतर पुन्हा तीन वर्षांनंतर सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला. यावरून तपास करण्यापेक्षा सीबीआयचा केस बंद करण्याकडे अधिक कल असतो हे स्पष्ट झाले, असा आरोप सतीश शेट्टी यांचे बंधू संदीप शेट्टी यांनी केला.

डाॅ. दाभोलकर हत्येप्रकरणी सूत्रधार अद्यापही माेकाट : पाेलिसांनी नऊ महिने तपास केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने डाॅ.नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण सव्वासहा वर्षांपूर्वी तपास सीबीआयकडे हस्तांतरित केले. सीबीआयने या प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करून त्यांच्याविराेधात न्यायालयात दाेषाराेपपत्र दाखल केले. मात्र, अद्याप या गुन्ह्यातील सूत्रधार पकडले गेले नाहीत. तसेच गुन्ह्यातील पिस्तूल, बाइक सापडलेली नाही, असे डाॅ. हमीद दाभाेलकर म्हणाले.

राजकीय हस्तक्षेप, मनुष्यबळाची कमतरता असल्याचा दावा
- आॅगस्ट २०१३ : डाॅ.नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या घालून हत्या
- जानेवारी २०१० : माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांची हत्या
- जून २०१३ : अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरण
सीबीआय तपासाच्या संथगतीमुळे ही तीन संवेदनशील, हायप्रोफाइल प्रकरणे अद्यापही तडीस गेली नाहीत.

या आहेत प्रमुख त्रुटी
१. संथगतीमुळे अनेक वेळा तपास पूर्णच होत नाही. २. तपास अधिकाऱ्याकडे विशेष अधिकार नसतात. दिल्लीतील वरिष्ठ अधिकारी निर्णय घेतात. ३. राजकीय हस्तक्षेप, ढवळाढवळ. ४. मनुष्यबळाची कमतरता.

सुशांत प्रकरणाचे दाभोलकर हत्येच्या चौकशीसारखे होऊ नये : शरद पवार
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयमार्फत २०१४ मध्ये चौकशी सुरू करण्यात आली आहे. मात्र, अद्याप सीबीआय त्यात कुठल्याही ठोस निष्कर्षाप्रत येऊ शकलेली नाही. त्यामुळे या चौकशी प्रक्रियेप्रमाणे सुशांतसिंह प्रकरणाच्या तपास कार्याची परिणती होऊ नये, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्वीटद्वारे व्यक्त केली आहे. आपल्या ट्वीटमध्ये पवार पुढे म्हणतात, सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश दिला आहे. मला खात्री आहे की महाराष्ट्र सरकार या निर्णयाचा आदर करून चौकशी प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करेल.

तपासासाठी सीबीआय पथक मुंबईत
मुंबई | अभिनेता सुशांतसिंह आत्महत्येप्रकरणी तपास करण्यासाठी सीबीआयचे पथक गुरुवारी सायंकाळी मुंबईत दाखल झाले. विमानतळावर हे पथक दाखल होताच प्रसारमाध्यमांनी त्याला घेराव घातला. परंतु कोणतेही भाष्य न करता हे पथक तत्काळ विमानतळाहून बाहेर पडले. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात याचिका दाखल न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तत्पूर्वी, गुरुवारी मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची मंत्रालयात भेट घेतली.

बातम्या आणखी आहेत...