आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाखत:शेतकऱ्यांना दिलासा देण्यात केंद्र-राज्य अपयशी, आरबीआयचे नियंत्रण नसेल तर आम्हीच हातात दंडुका घेऊ : शेट्टी

पुणेएका वर्षापूर्वीलेखक: मंगेश फल्ले
  • कॉपी लिंक

काेराेनाच्या संकटामुळे शेतमाल शेतात पडूनच खराब झाला. ग्राहकापर्यंत तो पाेहोचू न शकल्याने त्याचे नुकसान झाले आणि शेतकरी हवालदिल झाला. लाॅकडाऊनदरम्यान उद्याेगधंद्यावर अवलंबून असलेला शहरी वर्ग नाेकरी गमावल्याने आणि पगार कपात झाल्याने गावाकडे परतू लागला आणि अतिरिक्त नाेकरीचा बाेजा शेतीवर पडला. अशा प्रसंगी शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारने दिलासा देण्याची गरज हाेती. मात्र, शेतकऱ्यांसाठी कोणतीच पावले सरकार उचलताना दिसत नसून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर मार्ग काढण्यात सरकार अपयशी ठरल्याची भावना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना व्यक्त केली.

> युरियासह खतांच्या तुटवड्यासंर्दभात आपणास काय वाटते ?

शेट्टी : केंद्र सरकारने युरिया खतावरील सबसिडी कमी केल्याने सध्या तुटवडा जाणवत आहे. राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा करतानाच खत निर्माण करणाऱ्या कंपन्यांना त्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र, तसे हाेताना दिसत नाही. केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना भासवत असलेल्या खताच्या तुटवड्यावर प्राधान्याने मार्ग काढणे अपेक्षित आहे.

> पीक कर्ज देण्याबाबत बँका चालढकल करत असल्याने नेमके काय करता येईल?

शेट्टी : शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज उपलब्ध करण्याकरता बँकांनी खरेतर पुढाकार घेणे गरजेचे आहे. मात्र, बँका वेळाेवेळी मनमानी कारभार करत असल्याने त्यांच्यावर आरबीआयचा अंकुश नाही हे दिसून येते. बॅंका जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना पैसे देत नाहीत. उद्याेगपती विजय मल्ल्यांसारख्यांना कर्जमाफी देतील, पण शेतकऱ्यांना मदत करणार नाही. आरबीआय बँकांवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरत असेल तर आम्हालाच हातात दंडुका घेऊन न्याय मिळवावा लागेल.

> शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तुमची आक्रमकता कमी झाली. कारण काय?

शेट्टी : शेतमालास बाजारभाव मिळत नाही. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांच्या मालास किमान अपेक्षित दर मिळावा याकरता शासन प्रयत्नशील हवे. गाेवंश बंदी हत्या कायद्यामुळे भाकड जनावरांचा प्रश्न शेतकऱ्यांसमाेर निर्माण झाला आहे. जमावबंदीमुळे आंदाेलन करण्यास मर्यादा असल्याने प्रत्यक्ष आंदाेलन करता येत नाही.

> शेतीवर सध्या अतिरिक्त बेराेजगारांचा भार वाढला आहे, यावर काय उपाययाेजना कराव्यात?

शेट्टी : लाॅकडाऊनमुळे उद्याेग ठप्प झाले. शहरातील लाेक गावाकडे परतू लागल्याने शेतीवर अतिरिक्त लाेकांचा भार पडला आहे. परंतु शेती क्षेत्रात अतिरिक्त भार सामावून घेण्याची क्षमता आहे. काेराेनामुळे बिघडलेली आर्थिक घडी स्थिरस्थावर करण्यासाठी सरकारने शेती, कापड उद्याेगास चालना द्यावी.

> प्रश्न : काेल्हापूर, सांगलीत पुन्हा एकदा महापुराची स्थिती निर्माण झाली, कर्नाटक व महाराष्ट्र सरकार पूर नियाेजन करण्यात कमी पडते का?

शेट्टी : यंदा कमी वेळेत अधिक पाऊस पडल्याने नदीची पाणीपातळी वाढली. कर्नाटकात पाणी जाताना नृसिंहवाडी ते अलमट्टी धरण परिसरात केवळ एक किलाेमीटरचा उतार आहे. त्यामुळे अलमट्टी धरणात पाणीसाठा करण्यात येत असल्याने सांगली, काेल्हापुरात पूरसदृश्य परिस्थिती दिसून येते. अलमट्टी धरणात ५२२ मीटर पाणीसाठा करण्यास परवानगी असून त्यांनी मर्यादेपेक्षा अधिक पाणीसाठा करू नये याकरता दाेन्ही सरकारसाेबत मी पत्रव्यवहार करत आहे.

बातम्या आणखी आहेत...