आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Ceremony On The Occasion Of The Centenary Silver Jubilee Of The Datta Mandir Trust By The Pushpavrishti Datta Mandir Trust From A Helicopter At The Datta Mandir In Pune; Crowd Of Devotees

पुण्यात दत्त मंदिरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी:दत्त मंदिराच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सोहळा; भाविकांची गर्दी

पुणे9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांगोळीच्या पायघड्या... मंदिराला केलेली आकर्षक पुष्प सजावट... सनईचे मंगलमय सूर... दत्त नामाने भक्तिमय झालेले वातावरण आणि हेलिकॉप्टर मधून मंदिरावर होणारी पुष्पवृष्टी पाहून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात पुणेकरांचे हात आपसूकच जोडले. हेलिकॉप्टर मधून होणारी पुष्पवृष्टीचे विलोभनीय दृश्य पाहण्याची संधी यावेळी पुणेकरांना मिळाली.

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हेलिकॉप्टर मधून मंदिरावर सुभाष सरपाले, वैशाली सरपाले यांच्या हस्ते पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच सोहळ्यादरम्यान शिधा संकल्प योजनेअंतर्गत १२५ अनाथ अपंगांचे संगोपन करणाऱ्या व परितक्त्या महिलांचा सांभाळ करणाऱ्या संस्थांना व वृद्धाश्रमांना धान्य वाटप करण्यात आले. यावेळी संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, मुकुंदजी लोहिया ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त पुरुषोत्तमदास लोहिया, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुणे महानगरचे कार्यवाह महेश करपे, पं. वसंत गाडगीळ, ईशान्य पूरम संस्थेचे विनीत कुबेर, ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त ॲड. शिवराज कदम जहागीरदार, खजिनदार महेंद्र पिसाळ, ॲड. रजनी उकरंडे, युवराज गाडवे, सुनील रुकारी, डॉ.पराग काळकर, राजू बलकवडे, अक्षय हलवाई आदी उपस्थित होते. यावेळी ईशान्य पुरम् संस्था, माई बाल भवन, लोकसेवा संस्था इत्यादी संस्थांना धान्य देण्यात आले.

डॉ. सदानंद मोरे म्हणाले, पुण्यातील ऐतिहासिक संस्कृती जपण्यासाठी अशा शतकोत्तर संस्थाचा मोलाचा वाटा आहे. सामाजिक काम करून या संस्था त्यांच्या कार्याची व्याप्ती आणखी वाढवत आहेत. लोकमान्य टिळकांच्या काळात पुण्यातील दगडूशेठ कुटुंबियांचे अत्यंत मोलाचे योगदान होते. लोकमान्य टिळक तुरूंगातून बाहेर आल्यानंतर पुण्यातील लोक त्यांच्यासाठी उपहार म्हणून विविध भेटवस्तू घेऊन जात होते. त्यावेळी हलवाई कुटुंबीयांनी त्यांच्यासाठी नानकटाई आणली होती, अशी आठवण देखील त्यांनी यावेळी सांगितली.

महेश करपे म्हणाले, पुण्यातील धार्मिक, आरोग्य, राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक शक्ती जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय होऊ शकते याची प्रचिती या कार्यक्रमातून मिळते. ट्रस्टच्यावतीने चालणाऱ्या उपक्रमात संघ नेहमी त्यांच्या मदतीसाठी असेल, असेही त्यांनी सांगितले.

प्रताप परदेशी म्हणाले, ट्रस्टच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील विविध घटकांसाठी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. महोत्सवाचा शुभारंभ आज वृद्धाश्रम व संस्थांना शिधा वाटप करून झाला. यावेळी मंदिराचा इतिहास व आज पर्यंत चालणाऱ्या उपक्रमांची माहिती देखील त्यांनी सांगितली.

सकाळी १० वाजता अक्षय हलवाई यांच्या हस्ते लघुरुद्र याग करण्यात आला. मंदिरातील माध्यान्ह आरती पुण्याचे पोलिस सह आयुक्त संदिप कर्णिक यांच्या हस्ते करण्यात आली.

------

बातम्या आणखी आहेत...