आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशीलकुमार राजकारणात कसे आले?:पवारांनी सांगितला किस्सा; शिंदे म्हणाले - पहिल्या निवडणुकीचा खर्चही पवारांनीच दिला!

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे राजकारणात कसे आले, याचा किस्सा स्वतः शरद पवारांनी सांगितला, तर शिंदे यांनी पहिल्या निवडणुकीचा खर्चही पवारांनी दिल्याचा उल्लेख केला.

सुशीलकुमार शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या हस्ते सोमवारी महर्षी पुरस्काराने पुण्यात गौरव झाला. यावेळी जुन्या राजकारणाचा एक वेगळाच पट उलगडला. या कार्यक्रमाला माजी मंत्री विश्वजित कदम, उल्हास पवार, आबा बागुल, जयश्री बागुल, ॲड प्रताप परदेशी व्यासपीठावर उपस्थित होते.

काय म्हणाले शरद पवार?

पुणे शहरात अनेक पुरस्कार दरवर्षी दिले जातात. देशात एखाद्या शहरात सर्वाधिक पुरस्कार हे केवळ पुणे शहरात दिले जातात. सुशीलकुमार शिंदे यांचे सार्वजनिक जीवनातील आयुष्य संघर्षात गेले आहे. शून्यातून त्यांनी कामाला सुरुवात केली आणि मोठे काम निर्माण केले. त्यांना अनेकवेळा मी नोकरी सोडून द्या सांगितले आणि राजकारणात या म्हणालो. त्याप्रमाणे त्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला पक्षाने त्यांना तिकीट द्यावे, असा आग्रह मी पक्ष नेतृत्वाकडे धरला.

स्वतःच्या कर्तुत्वाने त्यांनी पुढे निवडणूक लढवल्या आणि वेगवेगळी पदे भूषवत ते जीवनात यशस्वी झाले. निवडणुकीमध्ये यश - अपयश असते. लहान, अल्पसंख्याक समाजातील लोकांच्या पाठीशी राहणे आवश्यक असते, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सोमवारी व्यक्त केले. पुणे नवरात्र महोत्सव आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

पवारांनी मला राजकारणात आणले - शिंदे

सत्काराला उत्तर देताना शिंदे म्हणाले की, पवार यांनी मला राजकारणात आणले आहे. महाराष्ट्राचे पवार आकर्षण असून, ते माझे ही आकर्षण आहेत. मी राजकारणात येताना त्यांनी मला धीर दिला. यशवंतराव चव्हाण यांना भेटून त्यांनी मला राजकारणात आणण्याचे सांगितले आणि घेऊन आले. यशवंतराव चव्हाण यांचे कार्य चिरंतन ठेवण्यासाठी त्यांनी मुंबईत केंद्र उभारणी केली आहे. समाजातील छोटी माणसे मोठी करण्याचे काम पवार यांनी करत राज्यात अशाप्रकारे अनेक नेते तयार केले. तिकीट देवून लोकांना निवडून आणण्याचे काम त्यांनी केले.

मला 1971 मध्ये माझ्या निवडणुकीस 16 हजार रुपये खर्च आला आणि पवार यांनीच त्यासाठी पैसे दिले. मला सातत्याने सोबत घेऊन ते राज्यभर फिरत होते. त्यातून अनेक गोष्टी मला शिकण्यास मिळाले. राजकारणातील डावपेच ही मी त्यांच्याकडून शिकलो. काँगेस पक्षास आव्हान देवून पवार एक वैचारिक भूमिका घेऊन वेगळे झाले आणि मुख्यमंत्री झाले आणि देशाला त्यांचे नेतृत्व दिसून आले. आज देशात ज्या प्रकारे फिरतात आणि देश एकसंध व सर्वधर्म समभाव व्हावा यासाठी फिरतात ते प्रेरणादायी असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...