आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समस्या:पुणे शहरात पोलिसांसमोर वाहनचोरी रोखण्याचे आव्हान; २ वर्षांत तब्बल २,४७२ वाहने गेली चोरीला

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वोच्च सर्वाधिक वाहनांची संख्या असलेल्या पुणे शहरात वाहन चाेरीच्या घटना वारंवार घडत अाहेत. दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहनांची चाेरी करून सदर वाहने राज्यातील विविध ठिकाणी कमी किमतीत विक्री अथवा गाड्यांचे पार्ट वेगळे करून विक्री केली जात असल्याने पाेलिसांसमाेर वाहन चाेरांचे अाव्हान निर्माण झालेले अाहे. पुणे शहरात चालू वर्षासह मागील दाेन वर्षांत तब्बल दाेन हजार ४७२ वाहने चाेरीस गेली असून त्यापैकी केवळ एक हजार २९ वाहनांची चाेरी उघडकीस अाली अाहे. शहरात लाेकसंख्येपेक्षा वाहनांची संख्या अधिक असून २७ लाखांपेक्षा अधिक दुचाकी, तर नऊ लाख चारचाकी वाहने रस्त्यावर असल्याने वाहतूक काेंडीचा सामना सातत्याने नागरिकांना करावा लागताे. वाहने पार्किंग करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने दिसेल त्या ठिकाणी वाहने पार्क केली जातात अाणि हीच संधी साधत वाहनचाेर त्यांचा डाव साधतात.

बुलडाणा, लातूर, उस्मानाबाद, अहमदनगर, साेलापूर, नांदेड अादी राज्यातील ठिकाणांवरून वाहनचाेर पुण्यात दाखल हाेऊन पुण्यातील हडपसर, चतुश्रृंगी, सिंहगड, भारती विद्यापीठ आणि कोंढवा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत प्रामुख्याने चाेरी करत असल्याने सदर भागात वाहन चोरांचा सुळसुळाट जास्त अाहे.. वाहन चोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी सातत्याने नाकेबंदी आणि सराईतांची झाडाझडती पोलिसांकडून घेतली जाते तसेच अनेकदा विशेष मोहीम राबवली जात आहे. सराईत वाहन चोर कारागृहातून जामिनावर सुटल्यावर पुन्हा वाहन चोरीकडे वळतात, तर दुसरीकडे माैजमजा करण्याकरिता अल्पवयीन मुले व तरुण नव्याने वाहन चोरीच्या गुन्ह्यात सहभाग घेत असल्याने वाहन चोरांवर अंकुश ठेवणे अवघड होत आहे. वाहने केवळ पटकन विक्री करून पैसे मिळवण्याच्या उद्देशाने चोरले जात नाही. यातील बहुतांश गुन्हे हे चोरलेले वाहन पेट्रोल संपेपर्यंत वापरून नंतर ते रस्त्यात सोडून देण्यासारखे प्रकारही घडले आहेत. काही शाळकरी, काॅलेजची मुले मित्र, मैत्रिणींवर प्रभाव पाडण्यासाठी वाहन चोरतात. यातून रस्त्यावर वेबारस सोडलेल्या वाहनांचे मालक शोधण्याचे अाव्हान पाेलिसांसमाेर अाहे.

वाहनांच्या सुरक्षेची काळजी काेणीच घेत नाही
नागरिक हजारो आणि लाखो रुपये खर्च करून महागडी वाहने खरेदी करत असतात. वाहनांच्या सर्व्हिसिंगसाठीही नियमीत पैसे खर्च करतात. मात्र, वाहनांच्या सुरक्षेसाठी कोणतीच काळजी घेत नाहीत. एखाद्या नामवंत कंपनीचे मजबूत असलेले लॉक जरी वाहनाला बसवले तरी आपले वाहन चोरीला जाणार नाही. मात्र, महत्त्वाच्या असणाऱ्या लॉककडेच नागरिक दुर्लक्ष करतात अाणि चाेरटे त्याचा फायदा उचलतात. सार्वजनिक ठिकाणी तसेच घराच्या बाहेर लावलेली वाहने रात्री नऊ ते सकाळी सहाच्या दरम्यान चोरीला जाण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून अाले आहे. - सुरेंद्र देशमुख, सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा-पुणे

बातम्या आणखी आहेत...