आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावादग्रस्त वक्तव्याप्रकरणी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या मनोज गरबडे आणि अन्य दोन साथीदारांना बुधवारी जामीन मंजूर करण्यात आला. कार्यकर्त्यांनी गरबडे आणि अन्य दोघांना खांद्यावर उचलून घेत जल्लोष केला. तसेच वाजगाजत मिरवणूकही काढण्यात आली. तर दुसरीकडे दहा पोलिसांचे निलंबन पोलिस प्रशासनाने मागे घेतले आहे.
बाबासाहेबांना अभिवादन
जामीन मंजूर होताच मनोज आणि त्याचे अन्य दोन साथीदार विजय होवाळ, आकाश इजद यांनी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात मोठ्या प्रमाणात आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते एकत्र आले होते. आज सकाळीच डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडियाच्या सुकुमार कांबळे यांनी मनोज गरबडे आणि त्याचा साथीदारांची हत्तीवरुन मिरवणूक काढणार असल्याचं सांगितलं होतं.
भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पैठण येथे वारकऱ्यांच्या एका कार्यक्रमामध्ये बोलताना कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडरकर आणि महात्मा जोतिराव फुले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. यानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर पुण्यात शाईफेक करण्यात आली.
चंद्राकांत पाटील पिंपरी चिंचवड येथे एका कार्यक्रमासाठी गेले असता तेथे समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शाई फेकली होती. शाईफेक करणारे मनोज गरबडे, विजय होवाळ, आकाश इजद यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर बंदोबस्तात असणाऱ्या 10 पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
त्या 10 पोलिसांचे निलंबन अखेर मागे
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर पिंपरी -चिंचवड पोलिस दलातील 10 जणांचे निलंबन करण्यात आले. या पोलिसांना निलंबनातून मुक्त करण्यात आले असून त्यांना त्यांच्या मूळ नेमणुकीचे ठिकाणी कर्तव्यकरिता 'सेवेत पुनः स्थापित' करण्यात आले. बदली होण्यापूर्वी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी याबाबतचे आदेश दिले.
यांचे निलंबन मागे
पोलिस निरीक्षक सतीश नांदुरकर, उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे, गणेश माने, सहाय्यक फौजदार भाऊसाहेब सरोदे, दीपक खरात, पोलिस हवालदार प्रमोद वेताळ, पोलीस नाईक देवा राऊत, सागर अवसरे, कांचन घवले, पोलिस कर्मचारी प्रियांका गुजर यांना निलंबनातून मुक्त करण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्धच्या शिस्तभंग विषयक कार्यवाहीच्या अधीन राहून त्यांचे निलंबन संपुष्टात आणले आहे. तसेच या पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना निलंबनातून मुक्त करून त्यांना त्यांच्या मूळ नेमणुकीच्या ठिकाणी कर्तव्याकरिता सेवेत पूर्ण स्थापित करण्यात येत आहे, असे आदेशात नमूद आहे.
चंद्रकांत पाटील शनिवारी (10 डिसेंबर) सायंकाळी चिंचवड येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी चिंचवडगाव येथील भाजपच्या एका पदाधिकाऱ्याच्या निवासस्थानी मंत्री पाटील गेले होते. दरम्यान मंत्री पाटील यांच्यावर शाईफेक झाली. त्यानंतर पोलीस निरीक्षकासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते.
चंद्रकांत पाटील यांचीही होती सूचना
या कारवाईवरून पिंपरी -चिंचवड पोलिस दल तसेच विविध राजकीय पक्ष, विविध संघटना, राजकीय नेते व पदाधिकारी यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच या पोलिसांचे निलंबन मागे घेण्यात यावे अशी मागणीही करण्यात आली. याबाबत काही जणांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केली. मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही पोलिसांचे निलंबन मागे घेण्याची सूचना केली होती.
निलंबनातून मुक्तता
निलंबन मागे घेण्याच्या मागणीचा रेटा वाढल्याने पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी निलंबन प्रकरणी चौकशी अहवाल तात्काळ सादर करावा, असे आदेश पोलिस उपायुक्तांना दिले होते. दरम्यान मंगळवारी रात्री पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांची बदली झाली. मात्र तत्पूर्वी आयुक्त शिंदे यांनी संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना निलंबनातून मुक्त केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.