आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी हे महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याची शक्यता आणखी दाट झाली आहे. राजू शेट्टी यांनी यासंदर्भात तसे संकेत दिले आहेत. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपशी हातमिळवणी करणार असल्याचे तर्कवितर्क राजकीय वर्तुळात लढवले जात आहेत. यातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राजू शेट्टींना ऑफर दिली आहे. राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सोडली आणि भाजपमध्ये येण्याची तयारी दर्शवली तर आम्ही त्यांचे नक्की स्वागत करू, असे चंद्रकांत पाटील यांनी टि्वट करून म्हटलं आहे.
राजू शेट्टी हे शेतकर्यांचे नेते असून त्यांचीही काही प्रश्न असतात. त्यांनी दिल्लीत जंतरमंतर येथे जाऊन आंदोलन करावे, आम्ही देखील त्या आंदोलनात सहभागी होऊ, असं भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. भाजपातील काही ध्येयधोरणे त्यांना पटली नाहीत म्हणून राजू शेट्टीनी भाजपा सोडली होती. आता पुन्हा राजू शेट्टी हे महाविकास आघाडीमधून बाहेर पडून भाजप सोबत यायला तयार असतील तर त्याचे स्वागत आहे, असंही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
पक्ष बदलाचे राजू शेट्टी यांच्याकडून सकेंत -
धोरणात्मक निर्णय घेताना महाविकास आघाडी सरकार आम्हाला बेदखल करीत असेल तर त्यावर विचार करावा लागेल असे सुचक विधान स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांनी केले होते. याचा अर्थ राजू शेट्टी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता असून त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला हा धक्का असणार आहे. सरकारमधून बाहेर पडण्याचा मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही. महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सामुदायिक निर्णय होता. येत्या 5 एप्रिलला राज्य कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. त्यात चर्चा केल्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाईल, असे शेट्टी यांनी सांगितले. अर्थात येत्या 5 एप्रिलला स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपासोबत जाणार की नाही, हे स्पष्ट होईल.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रवास -
भाजप सोबत केंद्रात आणि राज्यात चार-पाच वर्षे काम केल्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजपची साथ सोडली होती. त्यानंतर महाविकास आघाडी सोबत नवा संसार सुरू केला. लोकसभा निवडणुकीत आघाडीने स्वाभिमानीला दोन जागा दिल्या. पण हातकणंगले आणि सांगली या दोन्ही ठिकाणी संघटनेला पराभव पत्करावा लागला. यानंतर विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या यादीत शेट्टी यांचे नाव आहे. पण ही यादी राज्यपालांच्या कार्यालयातच अडकल्याने त्याचे भवितव्य आता राज्यपालांच्या हातात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून शेट्टी यांनी महाविकास आघाडीवर आसूड ओढण्यास सुरुवात केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.