आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे शहरातील रस्ते दुरुस्ती, स्वच्छ्ता, गटार आदी छोट्या कामांसाठी महानगरपालिकेने उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) वस्तुस्वरुपात, उपाययोजना स्वरूपात सहकार्य घ्यावे, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिल्या.
पुणे महानगरपालिकेत पालकमंत्री पाटील यांनी महानगरपालिकेच्या परिमंडळ व क्षेत्रीय कार्यालयामार्फत केल्या जाणाऱ्या कामांच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. बैठकीस मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, विकास ढाकणे यांच्यासह परिमंडळ कार्यालयांचे उपायुक्त, क्षेत्रीय कार्यालयांचे सहायक आयुक्त आदी उपस्थित होते.
यावेळी पाटील म्हणाले, महानगरपालिकेला शासनाच्या निधीतून तसेच स्वत:च्या उत्पन्नातून विविध स्वरुपाची कामे हाती घ्यावी लागतात. सीएसआरच्या माध्यमातून कोथरुडमध्ये ज्याप्रमाणे गटारची झाकणे, स्वच्छताविषयक कामे राबविण्यात येत आहेत त्याप्रमाणे पूर्ण शहरातही सीएसआरची मदत घेण्यासाठी प्रयत्न करावेत. जेणेकरुन मोठ्या कामांसाठी महानगरपालिकेला शासनाचा आणि स्वत:चा निधी वापरता येऊ शकेल.
नगरविकास विभागाकडून प्रभागाला दरवर्षी २ वेळा १० कोटी रुपये निधी मिळतो. त्यातून छोटी छोटी परंतु नागरिकांच्या गरजेची कामे करता येतील.नागरिकांच्या दैनंदिन समस्या, विकासकामांचे नियोजन याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे यापुढे दरमहा अशी बैठक घेण्यात येईल. शहरात झालेल्या अवकाळी पावसामुळे पाणी साचण्याच्या घटना घडल्या. त्याअनुषंगाने शहरात सुरू असलेल्या विकासकामांची, रस्ते, नालेसफाई आदी कामांची दर आठवड्याला ३ प्रभागात जाऊन स्वत: पाहणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
महापालिकेने प्राधान्याने रस्त्यावर साचणाऱ्या पाण्यावर काम करावे लागेल. शहरातील अतिक्रमणे, टेकड्यांवरील अतिक्रमणे, अवैध फेरीवाले यांच्याविरोधात कारवाई करावी. विद्रुपीकरण टाळण्यासाठी फ्लेक्सविरोधी कारवाई करावी. शहरातील स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, अशाही सूचना पाटील यांनी दिल्या. यावेळी पालकमंत्री पाटील यांनी रिक्त पदांचाही आढावा घेतला. पुरेशा मनुष्यबळासाठी नियमाप्रमाणे पदोन्नती तसेच पदभरतीची प्रक्रिया राबविण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावी, असे ते म्हणाले.
यावेळी आयुक्त विक्रम कुमार यांनी शहरातील नालेसफाईच्या कामाची माहिती दिली. नालेसफाईचे काम सुरू केलेले आहे. तसेच स्टॉर्म वॉटर ड्रेनेज स्वच्छतेच्या कामासही सुरूवात केली आहे. शहरात मोठा पाऊस झाल्यास पाणी साचणारी ३३८ ठिकाणे होती. तेथे आवश्यक उपाययोजना केल्यामुळे पाणी साचण्याचे बंद झाले असून अजून २३ ठिकाणे शिल्लक आहेत. आंबील ओढा येथे उपाययोजना केल्यामुळे पावसाचे पाणी आता साठत नाही, असेही त्यांनी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.