आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रकांत पाटील यांचे नाना पटोले यांना आव्हान:म्हणाले-तुम्ही पोटनिवडणूक बिनविरोध करा, आम्ही शैलेश टिळकांना उमेदवारी देऊ!

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टिळक यांच्या कुटुंबात तिकीट दिले असते तर आम्ही ही निवडणूक बिनविरोध केली असती असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. चंद्रकांत पाटील यांनी याला प्रत्युत्तर दिले आहे. पाटील म्हणाले, आम्ही टिळक यांच्या घरात उमेदवारी देतो. काँग्रेस ही निवडणूक बिनविरोध करणार का? महाविकास आघाडीशी चर्चा करून नाना पटोलेंनी उत्तर द्यावे.

एखाद्या लोकप्रतिनिधीचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबातील सदस्यालाच उमेदवारी देण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. चिंचवडमध्ये भाजपने ही परंपरा पाळली. मात्र, कसबापेठेत ही परंपरा पाळली नाही. त्यामुळे दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हिंदू महासभेनेही यावरुन टीका केली आहे.

बहुचर्चित ठरणाऱ्या कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपने शनिवारी उमेदवार जाहीर केले. कसबा पेठ येथून अपेक्षेप्रमाणे हेमंत रासने यांना तिकीट देण्यात आले, तर चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र रासणे यांच्या नावाला हिंदू महासभेने विरोध केला आहे. आनंद दवे देखील आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

अजून 48 तास बाकी

नाना पटोले म्हणाले, टिळक यांच्या कुटुंबात तिकीट दिले असते तर आम्ही ही निवडणूक बिनविरोध केली असती. त्यावर पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खरपूस समाचार घेत अजूनही 48 तास बाकी असल्याचे म्हटले आहे.

रासने अर्ज भरणार

पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात हेमंत रासने यांच्या पोटनिवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी सोमवारी सकाळी भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील हे कसबा गणपती याठिकाणी आले होते. कसबा गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर मोठे शक्ती प्रदर्शन करत भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी रासने यांचा अर्ज दाखल करण्यासाठी जात असताना पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आमचे ग्राउंडवर काम

ब्राह्मण समाजाला उमेदवारी दिली न गेल्याने पुण्यात बॅनरबाजी करण्यात आली आहे. याबाबत मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, समज आणि वस्तुस्थिती हे दोन वेगळे प्रकार आहेत. समज निर्माण करण्यासाठी केवळ फ्लेक्स लागतात. मात्र, वस्तुस्थिती निर्माण करण्यासाठी काम आवश्यक असते. आमचे ग्राउंडवर काम आहे.

खरे करून दाखवावे

चंद्रकांत पाटील म्हणाले, ब्राह्मण समाजाला याची जाणीव आहे की, भाजपने ब्राह्मण समाजाला कधी कोणती गोष्ट कमी पडू दिली नाही किंवा त्यांच्यावर अन्याय केला नाही. तराजूत कधी एका बाजूला तर कधी दुसऱ्या बाजूला माप द्यावे लागते. टिळक यांच्या घरात तिकीट दिले असते तर काँग्रेसने ही जागा बिनविरोध निवडून दिली असती असे म्हणणे त्यांनी खरे करून दाखवावे.

बिनविरोध जाहीर करा

चंद्रकांत पाटील म्हणाले, आम्ही दूध खुळे नाही किंवा. गाफील नाही. पटोले यांनी महाविकास चंद्रकांत पाटील म्हणाले, आघाडीतील बाकीच्या पक्षांशी बोलणी करून याबाबत सांगावे. त्यानुसार आम्ही पुनर्विचार करू. चिंचवड मध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे त्या ठिकाणची निवडणूक पहिली बिनविरोध जाहीर करावी असा टोलाही त्यांनी यावेळी काँग्रेसला लगावला.

चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्हा परिषद, महानगरपालिका ,नगरपालिका या ठिकाणच्या निवडणुकीबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात अद्याप झालेला नसून, संबंधित निर्णय झाल्यानंतर सदर ठिकाणी प्रभाग तीनचा करावा की चारचा विचार हे ठरवले जाईल आणि त्यानंतर निवडणुका घेतल्या जातील.

बातम्या आणखी आहेत...