आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराव्यंगचित्र या छोट्याशा कलाकृतीतून समाजातील न्यून दाखविले जाते. समाज आणि राजकारण्यांना ठिकाणावर आणण्याचे आणि चिमटे काढून अंकुश ठेवण्याचे प्रभावी माध्यम म्हणून व्यंगचित्रांना महत्त्व आहे. त्यामुळे शासनात असूनही माझे असे मत आहे की, कलाकारांची यादी करून त्यांच्या अर्थाजनासाठी शासनाने सहकार्य करावे असे आवाहन उच्चशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यंगचित्रकारांना रविवारी पुणे येथे केले.
विविध कला जोपासणाऱ्या कलाकारांना ठराविक काळ शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत केली जावी, अशी आग्रही भूमिका मांडून विद्यापीठांनी व्यंगचित्रकलेचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करावा आणि त्यासाठी शासनाकडून आवश्यक ती मदत करू, अशी ग्वाही देखील दिली.
जागतिक व्यंगचित्र दिनानिमित्त युवा संवाद सामाजिक संस्थेच्या वतीने व कार्टूनिस्ट्स् कंबाईन यांच्या सहकार्याने बालगंधर्व कलादालनात ‘पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवा'चे आयोजन करण्यात आले आहे. पाटील यांनी महोत्सवाला भेट देऊन तिसऱ्या दिवशीच्या सत्राचे उद्घाटन केले.
चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, कार्टूनिस्ट्स् कंबाईनचे माजी अध्यक्ष चारुहास पंडित, संजय मिस्त्री, युवा संवाद सामाजिक संस्थेचे अध्यक्ष धनराज गरड, व्यंगचित्रकार विश्वास सूर्यवंशी मंचावर होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, शासनात असूनही माझे असे मत आहे की, कलाकारांची यादी करून त्यांच्या अर्थाजनासाठी शासनाने सहकार्य करावे. नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांना विविधांगी शिक्षण दिले जावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी स्वायत्त विद्यापीठांनीही पुढाकार घ्यावा. व्यंगचित्रकारांच्या संघटनेतर्फे राबविण्यात येणाऱ्या आगामी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग असेल असे आश्वासन त्यांनी दिले.
धनराज गरड यांनी स्वागत केले. संजय मिस्त्री यांनी कार्टूनिस्ट्स् कंबाईनच्या उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन योगेंद्र भगत यांनी केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.