आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मे अखेरपर्यंत सातव्या वेतन आयोगानुसार फरकाची रक्कम अदा करा-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे महानगरपालिकेला निर्देश
पुणे , प्रतिनीधी -
पुणे महापालिकेतील १ जानेवारी २०१६ नंतर सेवानिवृत्त झालेल्या सेवक, प्राथमिक, माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागातील सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार कार्यवाही करुन फरकाची रक्कम मे अखेर अदा करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.
शासकीय विश्रामगृह येथे पुणे मनपा सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, पुणे मनपा प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी डॉ. मिनाक्षी राऊत, तसेच महानगरपालिका सेवानिवृत्त सेवक संघाचे अध्यक्ष संभाजी भोसले यांच्यासह निवृत्त सेवक संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पुणे महापालिकेअंतर्गत प्राथमिक शिक्षण विभागातील एकूण २ हजार ५५३ सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी असून तर सन २०१६ पूर्वी शिक्षक व शिक्षकेतर सेवानिवृत्त झालेले कर्मचारी १ हजार ९४३ आहेत. १ जानेवारी २०१६ नंतर सेवानिवृत्त झालेल्या पुणे महानगरपालिकेतील सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना ७ वा वेतन आयोग लागू करण्याबाबत एकूण ३५० सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची विवरणपत्रे तयार केलेली आहेत. त्याअनुषंगाने तांत्रिक अडचणी, वेतन निश्चितीतील त्रुटी पूर्तता करण्याचे काम सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यावर सर्व अडचणी मेअखेरपर्यंत दूर करुन निवृत्तीवेतन योजना लागू करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी दिल्या.
महापालिकेअंतर्गत सेवकांची एकूण १०७ निवृत्तीवेतन प्रकरणे असून त्यातील त्रुटीची पूर्तता करून निवृत्तीवेतन धारकांना लाभ देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. आतापर्यंत २०१६ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना १० महिन्याचा फरक व वेतन आयोगाचा पहिला हप्ता देण्यात आला आहे. त्याप्रमाणे २०१६ पूर्वीच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सर्व लाभ देण्यात आले आहेत, अशीही माहिती मनपाच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली. सदरचे कामदेखील तातडीने पूर्ण करुन हे अखेरपर्यंत ७ वा वेतन आयोगानुसार वाढीव निवृत्तीवेतन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना द्यावी. तसेच दोन महिन्यांनंतर सेवा उपदानाची रक्कम देखील अदा करावी, अशा सुचना पालकमंत्री पाटील यांनी यावेळी शिक्षण अधिकाऱ्यांना दिल्या.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.