आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे:राष्ट्रवादीसह सर्वच फेक अकाउंट्स तपासा, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची पुण्यात पत्रकार परिषदेत मागणी

पुणे7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘उत्तर प्रदेशातील हाथरसची घटना निंदनीयच, पण राज्यात हाथरससारख्या घटना राेज घडतात'

सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांच्या बदनामीसाठी समाज माध्यमात ८० हजार बनावट खाती उघडण्यात आल्याचे मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने केलेल्या चौकशीतून समोर आले आहे. त्यावर ‘बनावट अकाउंटचा सर्वच पक्षांना त्रास आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसह सर्वच पक्षांची बनावट अकाउंट्स आणि सरसकट सर्व ट्रोलिंगची सायबर सेलच्या माध्यमातून चौकशी करावी, अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

‘राज्यात हाथरससारख्या घटना रोज घडत असताना, त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांना बोलायला वेळ मिळत नाही. मग अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी अद्याप केंद्रीय अन्वेषण विभागाचा (सीबीआय) अहवाल अद्याप जाहीर नसताना गृहमंत्र्यांना प्रतिक्रिया देण्याची घाई का, असा सवालही त्यांनी केला. सुशांतसिंहने आत्महत्या केल्याचा अहवाल एम्स रुग्णालयाने दिल्यानंतर या विषयावर राजकारण तापले आहे. या प्रकरणावरून गृहमंत्री देशमुख यांनी ‘महाराष्ट्र व मुंबई पोलिसांची बदनामी करणारे बिहारचे तत्कालीन पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांच्या प्रचाराला जाणार का,’ असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना केला. त्यावर ‘देशमुख हे राज्याचे गृहमंत्री आहेत की, एका पक्षाचे पुढारी,’ असा प्रति सवाल दरेकर यांनी केला.

राज्यात हाथरससारख्या घटना राेज घडतात
‘या प्रकरणी सीबीआयचा अहवाल अद्याप आला नसताना गृहमंत्र्यांनी प्रतिक्रिया देणे म्हणजे बाळंतीण बाळंत होण्यापूर्वी बाळाचे नाव ठेवल्यासारखे आहे,’ अशी तिरकस टिप्पणीही त्यांनी केली. ‘उत्तर प्रदेशातील हाथरसची घटना निंदनीयच आहे, पण राज्यात हाथरससारख्या घटना रोज घडत आहेत. रोह्यात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिला दरीत फेकून दिल्याची घटना घडली आहे, पनवेलला क्वाॅरंटाइन सेंटरमध्ये बलात्कार झाला आहे, तरीही गृहमंत्री उत्तर प्रदेशातील घटनेवरच बोलत आहेत. हे स्वत:चे अपयश झाकून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रकार आहे,’ अशी टीकाही त्यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...