आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तर याद राखा, गाठ माझ्याशी..:छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाचे विपर्यास्त चित्रण दाखवल्यास सहन करणार नाही- संभाजीराजे

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नव्याने प्रदर्शित करण्यात येणाऱ्या ऐतिहासिक चित्रपटात इतिहासाची मोडतोड करण्यात आली आहे. ज्या घराण्याचे आपण नाव सांगतो, जे नाव आणि कर्तृत्व, ही आपली अस्मिता आहे. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचे विपर्यास्त चित्रण दाखवले तर सहन करणार नाही, असा सज्जड दम छत्रपती संभाजीराजे यांनी रविवारी संबंधित निर्माते आणि दिग्दर्शकांना भरला.

पुण्यात रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत संभाजीराजे बोलत होते. आपल्या इतिहासावर, ऐतिहासिक महापुरुषांवर चित्रपट करणे, ही प्रशंसनीय बाब आहे, पण प्रत्यक्षात अशा चित्रपटांतून इतिहासाशी प्रतारणा होत असल्याचे दिसून येत आहे. 'सिनेमॅटिक लिबर्टी' च्या नावाखाली काय वाटेल ते दाखवले जात आहे, हे अजिबात खपवून घेणार नाही. मी छत्रपतींच्या घराण्याचे नाव सांगतो, मी वाटेत आडवा येईन, अशा शब्दांत संभाजीराजे संतापले होते.

सेन्साॅरने मंजुरी दिलीच कशी?

आपल्या इतिहासाची मोडतोड करण्यात आलेल्या चित्रपटांना सेन्सॉर बोर्डाने परवानगी दिलीच कशी, असा सवाल करत संभाजीराजे म्हणाले, 'विपर्यस्त चित्रण करणारे चित्रपट आपण प्रेक्षकांसमोर सादर करत आहोत, याचे भान कुठे हरवले आहे, याविषयी मी स्वतः सेन्सॉर बोर्डाला पत्र लिहिणार आहे. सरकारने आता ऐतिहासिक चित्रपटांसाठी वेगळी समिती नेमावी, असेही ते म्हणाले.

आपण सारेच मराठे

'आपण सारेच मराठे आहोत. इतिहास काळात मराठा ही 'जात' नव्हती. सर्व मराठी माणसे मराठा नावाने ओळखली जात होती. मात्र, ऐतिहासिक चित्रपटात याविषयी काय वाटेल ते दाखवले जात आहे. अशी मोडतोड होता कामा नये. लोकांना मी आवाहन करतो, की असले विपर्यस्त चित्रण दाखवणारे चित्रपट त्यांनी पाहू नयेत.

हे मावळे वाटतात का?

सुबोध भावे यांचा 'हर हर महादेव' आणि महेश मांजरेकरांचा 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटांचा विशेष संदर्भ देत संभाजीराजे यांनी चित्रपटाचे पोस्टर पत्रकारांना दाखवले. 'मावळे असे दिसत होते का, हे मावळे वाटतात का,? असा सवाल पत्रकारांनाच केला.

पेंढारकरांचा आदर्श समोर ठेवा

सर्व ऐतिहासिक चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांना मी जाहीरपणे सांगतो, की चुकीचा इतिहास चित्रित केलात, तर याद राखा, माझ्याशी गाठ आहे. तुम्हाला ऐतिहासिक चित्रपट करायचे असतील तर भालजी पेंढारकरांचा आदर्श समोर ठेवा. पुन्हा असे चित्रपट काढू दिले जाणार नाहीत असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...