आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात मुख्यमंत्री शिंदे आणि आदित्य ठाकरे आमने-सामने:एकाच दिवशी, एकाच वेळी अन् एकाच शहरात दौरा; तोफ कोणावर धडाडणार?

पुणे15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरेंच्या तोफा आज पुण्यात धडाडणार आहेत. एकनाथ शिंदे हे अतिवृष्टी, पेरणी आणि विकास कामांबाबतचा आढावा घेणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत दिवसभरात जाहीर सभेसह भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर, शिवसेनेचे नेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचीही संध्याकाळी कात्रज चौकात जाहीर सभा होणार आहे. शिंदे आणि ठाकरे यांच्या राजकीय तोफा धडाडणार असून, त्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात अतिवृष्टी, पेरणी आणि विकास कामांचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर ते 1.20 दरम्यान फुरसुंगी पाणी योजना प्रकल्पाची पाहणी करतील. दुपारी 2.15 ला ते श्री खंडोबा जेजुरी देवस्थान येथे जातील. त्यानंतर दुपारी पावणेतीन वाजता सासवड पालखी तळ मैदानावर शिवसेना पक्षाची जाहीर सभा होणार आहे. सध्या देशातील राजकारण मोठ्या प्रमाणात तापले असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी देखील सुरू आहे. त्यामुळे शिंदेंची तोफ कोणावर डागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

शिवसंवाद यात्रा पुण्यात

शिवसेना आमदारांनी बंड पुकारल्यानंतर आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. स्थानिक पातळीवर शिवसेनेला बळकटी देण्यासाठी हा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जाते. त्यापार्श्वभूमीवर शिवसेनेकडून शिवसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले असून, राज्यात विविध ठिकाणी त्यांची ‘निष्ठा’ यात्रा आणि ‘शिवसंवाद’ यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे.

आदित्य ठाकरे हे आज पुण्याच्या दौऱ्यावर असून, सायंकाळी पाच वाजता ते कात्रज चौकातील बस डेपोजवळ त्यांची जाहीर सभा होणार आहे. आदित्य ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून बंडखोरांवर टीका करताना पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर राजकीय वातावरण आणखी तापले आहे. या पार्श्वभूमीवर जाहीर सभेत आदित्य ठाकरे नेमके काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उत्सव मंडळाची बैठक

एकनाथ शिंदे हे रात्री साडेआठ दरम्यान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मंदिर आणि दत्त मंदिर येथे दर्शन घेतील. त्यानंतर रात्री नऊच्या सुमारास ते पोलिस आयुक्तालयात आगामी उत्सवासंदर्भात गणेश मंडळ व नवरात्र उत्सव मंडळांच्या बैठकीत चर्चा करणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...