आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरपावसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाप्पा चरणी लीन:राज्यावरचे सर्व संकट, ईडा-पिडा टळू  दे श्रीमंत दगडूशेठ गणपतीला केली प्रार्थना

पुणे22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोरदार पाऊस सुरू असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणरायाची आरती देखील केली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे त्यांचा महावस्त्र, सन्मानचिन्ह देऊन स्वागत सन्मान करण्यात आला.

यावेळी ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, सुनील रासने, अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी, तुषार रायकर, राजाभाऊ पायमोडे, सुनील जाधव, सचिन आखाडे आदी उपस्थित होते.

ईडा-पिडा टळू दे

यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, यावर्षीचा गणपती उत्सव जोरदार आहे. निर्बंधमुक्त गणेशोत्सव मोकळ्या मनाने मोकळा श्वास घेत संपूर्ण महाराष्ट्रात गणेशभक्त मोठया उत्साहात, जल्लोषात, धुमधडाक्यात हा साजरा करत आहेत. हे बघून फार आनंद होत असून समाधान वाटत आहे. तुमच्या आयुष्यात चांगले दिवस येवो. सुख-समृद्धीचे, भरभराटीचे दिवस येवोत. या राज्यावरचे सर्व अरिष्ट, संकट, ईडा-पिडा टळू देत, हीच गणरायाचरणी प्रार्थना असल्याचे त्यांनी गणेशभक्तांशी बोलताना सांगितले.

नाना पाटेकरांच्या घरी घेणार दर्शन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला कसबा गणपती मंडळाचे दर्शन घेऊन आरती केली. त्यानंतर जवळीलच त्वाष्टा कासार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि तरुण अशोक मित्र मंडळ या मंडळांना भेटी देऊन गणरायाचे आशीर्वाद घेतले. दगडूशेठ गणपतीची आरती केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अखिल मंडई मंडळ, तुळशीबाग गणपती मंडळ, श्री गुरुजी तालीम मित्र मंडळ, केसरीवाडा गणपती मंडळ, छत्रपती राजाराम मंडळ, यशवंत मित्र मंडळ यांनाही भेटी दिल्या.

पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या कोथरूड परिसरातील श्री साई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यासही भेट दिली आहे. पुण्यातील महत्त्वाच्या गणेश मंडळाचे दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री अभिनेता नाना पाटेकर यांच्या सिंहगड किल्ला पायथा परिसरातील डोणजे गावातील घरी गणरायाचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते मुंबईला रवाना होणार आहे.

आतापर्यंत 500 दर्शन

कार्यकर्त्यांतला नेता अशी ओळख असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच दिवसात चक्क पाचशेपेक्षा अधिक गणपती बाप्पांचे दर्शन घेण्याचा विक्रम केला आहे. यातले बहुतांश बाप्पा हे मुख्यमंत्र्यांच्या ठाणे शहरातील असून मुख्यमंत्री अगदी पहाटेपर्यंत दर्शन घेत फिरत हाेते, असे मुख्यमंत्र्यांच्या प्रसिद्धी कार्यालयातून सांगण्यात आले. यावर ‘मुख्यमंत्री केवळ सणात सक्रिय होतात’ अशी विरोधक टिका करत आहेत.

दिड दिवसांत 250 दर्शन

मुख्यमंत्री शिंदे यांनी दिड दिवसाच्या 250 पेक्षा अधिक बाप्पांचे दर्शन घेतले. हे बाप्पा बहुतेक ठाणे शहरातील होते. मुख्यमंत्री दक्षिण मुंबईतल्या शासकीय वर्षा बंगल्यावर निवासाला नसतात. ते अजूनही ठाण्यातील लुईसवाडीतील त्यांच्या खाजगी निवासस्थानी राहतात. त्यामुळे रात्री 10 ते पहाटे तीन पर्यंत ते गणेश दर्शन करु शकले. दिड दिवसाचे बाप्पा हे बहुतांश कार्यकर्त्यांच्या घरचे होते.

थोरातांनी घेतले दर्शन

काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सहकुटुंब श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे बुधवारी दर्शन घेतले. यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी मी आलो होतो, कोरोनाच दोन वर्षाचे संकटामुळे आपण मागील दोन वर्ष गणेशोत्सव साजरा करू शकलो नाही.

बातम्या आणखी आहेत...