आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक:राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे उमेदवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची घोषणा

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे हे उमेदवार असतील.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विटरवरुन ही घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते, अशी नाना काटे यांची ओळख आहे. ते पिंपरी-चिंचवड महापालिकेत सध्या नगरसेवक आहेत.

अश्विनी जगताप यांच्याशी लढत

कसबा व चिंचवड पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस आहे. अखेरच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप यांच्याशी आता मविआचे उमेदवार नाना काटे यांची लढत होईल. अश्विनी जगताप या भाजपच्या दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आहेत.

मविआ विजय मिळवेल - जयंत पाटील

महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र काम करून या निवडणुकीत आम्ही नक्कीच विजयी होऊ, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

26 फेब्रुवारी रोजी मतदान

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक 26 फेब्रुवारी रोजी होत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस आहे. कसबा तसेच चिंचवड पोटनिवडणुकीत भाजप विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे, शेकाप अशी महाविकास आघाडी मैदानात आहे.

अजित पवारांच्या उपस्थितीत भरणार अर्ज

आज मविआकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार नाना काटे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महादेव मंदिर पिंपळे सौदागर येथे येत आहेत. यावेळी महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाही हजर राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आले आहे.

राहुल कलाटे अपक्ष अर्ज भरणार

चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक कोण लढवणार? याचा सस्पेन्स राष्ट्रवादी काँग्रेसने शेवटच्या क्षणापर्यंत कायम ठेवला. काल (सोमवारी) अजित पवारांनी पुण्यातील पोटनिवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांची पिंपरी-चिंचवडमधे येऊन बैठक घेतली. त्यानंतर रात्री उशिरा शिवसेनेचे माजी नगरसेवक राहुल कलाटे हे अजित पवारांना त्यांच्या घरी जाऊन भेटले. मात्र, आज नाना काटे यांच्या नावाची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली.

राहुल कलाटे हे आधी शिवसेनेचे नगरसेवक होते. चिंचवड निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्याने 2019 मध्ये ते शिवसेनेतून बाहेर पडले व लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवली. त्यांना राष्ट्रवादीकडून पाठिंबा देण्यात आला होता. आता या पोटनिवडणुकीत राहुल कलाटे राष्ट्रवादीकडून इच्छुक होते. मात्र, आताही उमेदवारी न मिळाल्याने ते आता अपक्ष अर्ज भरणार आहेत.

संबंधीत वृत्त

कसबा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी

पुणे जिल्ह्यातील कसबा मतदार संघात विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्रित लढणार आहेत. कसबा मतदारसंघाची जागा काँग्रेस पक्ष लढवणार असल्याचा निर्णय झाला असून येथून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वाचा सविस्तर

बातम्या आणखी आहेत...