आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:चिंचवडकर देवांची गणेशोत्सव भाद्रपद वारी आज केवळ 5 भाविकांसह खासगी वाहनातून, तीनशे वर्षांची पायी वारीची परंपरा होणार खंडित

पुणे / जयश्री बोकीलएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दरवर्षी मोरगावचा मयूरेश्वर आणि मोरया गोसावीचा तांदळा यांची होते मंगल भेट

कोरोना संसर्गाच्या संकटामुळे पंढरपूरच्या पायी आषाढी यात्रेची परंपरा या वर्षी खंडित झाली. त्यापाठोपाठ तीनशे वर्षांहून अधिक परंपरा असणारी चिंचवडकर देवांची गणेशोत्सवातील भाद्रपद पायी वारीही संकटात आली आहे. शुक्रवारी सुरू होणाऱ्या या वारीसाठी प्रशासनाकडून केवळ पाच व्यक्तींनाच वारीसाठी परवानगी मिळाली असून, त्यांना खासगी वाहनातून वारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चिंचवडचे मोरया गोसावी देवस्थान भाविकांना सुपरिचित आहे. मोरया गोसावींना श्रीगणेशाचे दर्शन जिथे घडले, त्या मोरगाव तीर्थक्षेत्री दरवर्षी भाद्रपद शुद्ध तृतीयेला सुरू होणारी दहा दिवसांची पायी वारी चिंचवडकर देवस्थानकडून केली जाते. तीनशे वर्षांहून अधिक काळापासून पायी वारीची ही परंपरा सुरू आहे. शेकडो भाविकांचा या वारीत समावेश असतो.

पालखी खांद्यावर मिरवत पुणे, सासवड, जेजुरीमार्गे दरवर्षी मोरगाव येथे नेली जाते. मोरगाव येथे तीन दिवस मुक्काम असतो. विविध धार्मिक विधी या वेळी केले जातात. मोरगावचा मयूरेश्वर आणि मोरया गोसावींचा तांदळा यांची मंगल भेट होते. मोरया गोसावींच्या पदांचे गायन करत धूपारती होते. कऱ्हा नदीत स्नानविधी असतो. देवस्थानतर्फे महापूजा, प्रसादाचा उपक्रम होऊन, पालखी परतीच्या मार्गावर येते. यंदा कोरोनाच्या संकटामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पायी यात्रा न करता, मोजक्या पाच व्यक्तींनी वाहनातून यात्रा करावी, असा आदेश दिला आहे. संभाव्य संकट लक्षात घेता या आदेशाचे पालन करणार असल्याचे मोरया गोसावी देवस्थानचे विश्वस्त मंदार महाराज देव यांनी सांगितले. फिजिकल डिस्टन्सिंगचेही पालन करण्यात येणार आहे.

मोरया गोसावींचा तांदळा वर्षातून केवळ तीनदा येताे गाभाऱ्याबाहेर
मोरया गोसावींचा तांदळा वर्षातून फक्त तीन वेळा गाभाऱ्याच्या बाहेर येतो. माघी यात्रेसाठी तांदळा रथातून बाहेर पडतो आणि मोरगाव, थेऊर आणि सिद्धटेक येथे दर्शनासाठी जातो. भाद्रपद यात्रेत तांदळा मोरगावला जातो, तर ज्येष्ठी यात्रेत कोकणात अलिबागजवळच्या नारंगी या ठिकाणी नेला जातो, अशी माहिती मंदार महाराज यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...