आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपास:येरवडा कारागृहात कच्च्या कैद्यांच्या दोन गटात हाणामारी; सहा कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येरवडा कारागृहातील कैद्यांच्या दोन गटात वादातून हाणामारी झाल्याची घटना घडली. हाणामारीत २ कैदी जखमी झाले असून त्यांच्यावर कारागृहातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी ६ कैद्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हरीराम गणेश पांचाळ, मुसा अबू शेख अशी जखमी झालेल्या कैद्यांची नावे आहेत. याबाबत कारागृहातील रक्षक एकनाथ गांधले यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अर्जुन बाजीराव वाघमोडे, ओंकार नारायण गाडेकर, रोहन रामोजी शिंदे, साहिल लक्ष्मण म्हेत्रे, ऋषिकेश हनुमंत गडकर, मंगेश शकील सय्यद यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपी न्यायाधीन बंदी (कच्चे कैदी) आहेत. माहितीनुसार, आळंदी येथे २ गटात झालेल्या हाणामारी प्रकरणात अर्जुन वाघमोडे, ओंकार गाडेकर यांच्यासह साथीदारांना अटक करण्यात आली होती. येरवडा कारागृहातील कैदी हरिराम पांचाळ, मुसा शेख यांच्याशी त्यांचा वाद झाला होता. वादातून गाडेकर, वाघमोडे आणि साथीदारांनी बराक क्रमांक २ परिसरात हौदाजवळ प्लास्टिकची बादली, भाजी वाढण्याच्या वगरळ्याने पांचाळ आणि शेख यांना मारहाण केली. मारहाणीत शेख आणि पांचाळ यांना दुखापत झाली. कारागृह रक्षकांनी गाडेकर, वाघमोडे आणि साथीदारांना ताब्यात घेतले. पोलिस उपनिरीक्षक अशोक काटे पुढील तपास करत आहेत.