आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी शिवप्रतिष्ठान संस्थेचे संभाजी भिडे यांना क्लिन चिट देण्यात आली आहे. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान संभाजी भिडे यांच्याविरोधात कोणतेही सबळ पुरावे मिळाले नाहीत. त्यामुळे आरोपींमधून त्यांचे नाव वगळले, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी महाराष्ट्र राज्य मानव हक्क आयोगास लेखी पत्राद्वारे दिली आहे. तर, जयंत पाटलांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते संभाजी भिडेंच्या पाया पडतात. त्यामुळे भिडेंना क्लिन चीट मिळावी, यासाठी कुणी सुत्रे हलवली हे स्पष्ट होते, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
मुंबईतील मानव हक्क आयोगाबाबत काम करणारे वकील आदित्य मिश्रा यांनी संभाजी भिडे यांच्या विरोधात 2018 मध्ये दाखल गुन्ह्याच्या तपासात प्रगती नसल्याची तक्रार राज्य मानव हक्क आयोगाकडे केली होती. त्यावरून आयोगाने या प्रकरणाच्या तपासाबाबत पुणे पोलिसांना विचारणा केली असता या प्रकरणातून भिडेंचे नावच वगळल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
गुन्हा घडला तेव्हा भिडे सांगलीत!
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात 40 हून अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी काही महिन्यांपूर्वीच दोषारोपपत्र दाखल केले आहे. पुरावे मिळण्यासाठी पोलिसांनी बारकाईने तपास केला. मात्र, भिडे यांच्या विरुद्ध कोणताही ठोस पुरावा किंवा गुन्ह्यात ते सहभागी असल्याबाबत साक्षीदार मिळू शकले नाहीत. तसेच गुन्हा घडला त्यावेळी भिडे हे सांगली जिल्ह्यात उपस्थित असल्याचे काही साक्षीदार सांगत आहेत. त्यामुळे तपासाअंती भिडे यांच्याविरुद्ध दोषारोप ठेवता आला नाही, असे पोलिसांतर्फे सांगण्यात आले आहे, अशी माहिती भिडे यांचे वकील पुष्कर दुर्गे यांनी सांगितले. त्यामुळे भिडे वगळता इतर आरोपींच्या विरोधात शिवाजीनगर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
भिंडेच्या क्लिन चीट मागे राष्ट्रवादी काँग्रेस - प्रकाश आंबेडकर
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी यापुर्वी सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यात संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे या प्रकरणात दोषी असल्याचे पोलिसांनी म्हटले होते. आरोपींविरोधात ठोस पुरावा असल्याशिवाय पोलिसांना असे वक्तव्य देता येत नाही. मग आता पोलिसांनी अचानक यु-टर्न का घेतला, तेव्हाही पुरावे नव्हते तर भिडेंना दोषी कसे काय म्हटले होते, असे सवाल वंचित बहुजनज आघाडीचेच नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
तसेच, जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते संभाजी भिंडेच्या पाया पडतात. त्यामुळे सुत्रे कुठून हलले असतील हे स्पष्ट होते. गृहखातेदेखील राष्ट्रवादीकडेच आहेत. भिंडेना क्लिन चीट मिळावा, यासाठी पोलिसांवर दबाव आणला असावा, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.
शरद पवारांची भूमिका दुटप्पी
भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात चौकशी आयोगासमोर शरद पवार यांची दुटप्पी भूमिका समोर आली आहे. या आयोगासमोर हिंसाचाराचे हे सर्व प्रकरणच एक फ्रॉड असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यातून आरोपींना वाचवण्याचे त्यांचे प्रयत्न दिसत आहेत, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात सध्या 39 जणांवर गुन्हा दाखल आहे. प्रत्येक गुन्ह्याला माय-बाप असतोच. त्यामुळे या हिंसाचाराचा माय-बाप कोण, हे समोर आलेच पाहिजे, अशी मागणीही प्रकाश आंबेडकरांनी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.