आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Climb Mount Annapurna Updates; Climber Bhushan Hershey, Dr. Sumit Mandale And Jitendra Gaware Successfully Climb Mount Annapurna; News And Live Updates

गिर्यारोहण:​​​​​​​गिर्यारोहक भूषण हर्षे, डॉ. सुमित मांदळे व जितेंद्र गवारे यांची माऊंट अन्नपूर्णा शिखरावर यशस्वी चढाई

पुणे9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • माऊंट अन्नपूर्णा- एक (8091 मीटर्स उंच) हे जगातील दहावे उंच शिखर आहे

गिरिप्रेमी या पुण्यातील अग्रणी गिर्यारोहण संस्थेचे गिर्यारोहक भूषण हर्षे, डॉ. सुमित मांदळे व जितेंद्र गवारे यांनी जगातील दहावे उंच शिखर माऊंट अन्नपूर्णा- एक (8091 मीटर्स उंच) वर यशस्वी चढाई केली. उमेश झिरपे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली पार पडलेली ही गिरिप्रेमीची आठवी अष्टहजारी मोहीम असून अशी कामगिरी करणारी गिरिप्रेमी ही भारतातील पहिली नागरी गिर्यारोहण संस्था आहे.

गुरुवारी मध्यरात्री उशिरा कॅम्पने चारहून अंतिम शिखर चढाई सुरू झाली. कॅम्प चारवर झालेल्या प्रचंड बर्फवृष्टीमुळे अंतिम शिखर चढाई सुरू करण्यास उशीर झाला. त्यात पहाटेच्या सुमारास वार्‍याच्या वेग वाढल्याने चढाईची गती मंदावली. दुपारी बाराच्या सुमारास रूट ओपनिंग करणार्‍या शेर्पा संघाने यशस्वी चढाई केली, त्या मागोमाग गिरिप्रेमीच्या सदस्यांनी शिखरमाथा गाठला.

या विषयी अधिक माहिती देताना मोहिमेचे नेते उमेश झिरपे म्हणाले, “15 एप्रिल रोजी रूट ओपनिंग करणार्‍या शेर्पा संघाचे ‘समिट’ व आज 16 तारखेला गिरिप्रेमीच्या संघाचे ‘समिट’ असे नियोजन होते. मात्र, रूट ओपनिंग करणार्‍या संघाला 800 मीटर दोर कमी पडल्यामुळे तातडीने हेलिकॉप्टरच्या मदतीने काठमांडूहून एक हजार मीटर दोर मागवावा लागला व तो कॅम्प चार पर्यंत पोहचवावा लागला. त्यामुळे रूट ओपनिंग करणार्‍या शेर्पा संघाचे समिट एक दिवस लांबले. हवामानाचा अंदाज बघता रूट ओपनिंग संघाच्या मागोमाग गिरिप्रेमीच्या संघाने गुरुवारी रात्री बाराच्या सुमारास अंतिम शिखर चढाई सुरू केली. संपूर्ण रात्रभर चढाई दरम्यान संघाला जोर्‍याच्या वार्‍याच्या व हाडे गोठवणार्‍या थंडीचा सामना करावा लागला.

याच दरम्यान सकाळच्या सुमारास ढगाळ वातावरणात वाढ झाल्याने चढाईची गती कमी करावी लागली. शिखरमाथ्याच्या काही मीटर खाली असलेल्या घळीमधून चढाई करताना गिर्यारोहकांचा कस लागला. या सर्व अडचणींवर मात करत भूषण, सुमित व जितेंद्र यांनी 14 तासांच्या अथक व अविरत चढाई नंतर दुपारी सव्वादोनच्या सुमारास शिखरमाथा गाठला.”

सात अष्टहजारी शिखरांवर यशस्वी चढाई
‘माऊंट अन्नपूर्णा-एक’ ही गिरिप्रेमीची आठवी अष्टहजारी मोहीम असून याआधी 2012 साली माऊंट एव्हरेस्ट, 2013 साली माऊंट ल्होत्से (चौथे उंच शिखर), 2014 साली माऊंट मकालू (पाचवे उंच शिखर), 2016 साली माऊंट च्यो ओयू (सहावे उंच शिखर) व माऊंट धौलागिरी (सातवे उंच शिखर), 2017 साली माऊंट मनास्लू (आठवे उंच शिखर) तर 2019 साली माऊंट कांचनजुंगा (तिसरे उंच शिखर) अशा सात अष्टहजारी शिखरांवर यशस्वी चढाई केली आहे.

असे आहे अन्नपूर्णा शिखर
माऊंट अन्नपूर्णा एक हे शिखर नेपाळ हिमालयाच्या अन्नपूर्णा हिमाल पर्वतरांगेमध्ये स्थित आहे. या पर्वतरांगेमध्ये अनेक अतिउंच शिखरे असून अन्नपूर्णा पर्वत शिखर समूह विशेष प्रसिद्ध आहे. या पर्वतरांगेत 16 शिखरे ही सहा हजार मीटरपेक्षा उंच आहेत, 13 शिखरे सात हजार मीटरपेक्षा उंच आहेत तर अन्नपूर्णा-एक हे एकमेव अष्टहजारी शिखर आहे. एकूण 55 किलोमीटर लांबीचा अन्नपूर्णा शिखर समूह हा गंडकी व मार्श्यंगदी नद्यांच्या हिमनद्यांनी वेढलेला आहे. अन्नपूर्णा पर्वत समुहामध्ये शिखर चढाई करणे, हे अत्यंत अवघड मानले जाते. सततचे होणारे हिमप्रपात, अतिशय तीव्र धारांचा चढाई मार्ग यांमुळे या शिखरावर चढाई करणे, हे अत्यंत धोक्याचे आहे. आत्तापर्यंत केवळ अडीचशेच्या आसपास गिर्यारोहकांनी माऊंट अन्नपूर्णा-एक शिखरावर यशस्वी चढाई केली आहे. त्यामुळे गिरिप्रेमीच्या या यशस्वी चढाईचे महत्व अधोरेखित होते.

बातम्या आणखी आहेत...