आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उठसूट बोलणाऱ्या नेत्यांना ठाकरेंचा टोला:पर्यायी इंधन परिषदेत म्हणाले -विषय माहिती असो किंवा नसो मार्गदर्शन करणे राजकारण्यांचा आवडता छंद, पण मी हे धाडस करणार नाही

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताची सर्वात मोठी पर्यायी इंधन परिषद पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे. 2 ते 5 एप्रिलदरम्यान ही परिषद पार पडणार आहे. या परिषदेला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबोधित केले. यावेळी मार्गदर्शन करणं हा राजकारण्यांचा आवडता छंद आहे. मग विषय माहिती असो अथवा नसो. पण, मी ते धाडस करणार नाही. येथे तज्ज्ञ मंडळी आहेत. मी मार्गदर्शन करणार नाही, असे म्हणत त्यांनी कार्यक्रमाचे कौतूक केले. तसेच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून आपल्याला याचा अभिमान असल्याचे ते म्हणाले. याशिवाय, महाराष्ट्र हे नेहमी दिशा दाखवणारे राज्य असून महाराष्ट्रात ज्या गोष्टींची सुरवात होते. त्याचा स्वीकार संपूर्ण देश करतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

पर्यायवरणाची हानी होऊ न देता जर शाश्वत विकास करायचा असेल तर आपल्याला पर्यायी इंधनाचा मार्ग निवडावा लागेल. पेट्रोल, डिझेल आणि पर्यायी इंधनावर आपण चर्चा करत आहोत. हे एक मोठे पाऊल आहे. सुरवातीच्या काळात प्रवासासाठी जनावरांचा वापर होत असे. त्यानंतर वाफेची इंजन आली. लहानपणी एक गाणे होते, झूकझूक आगिन गाडी, धुराच्या रेषा हवेत सोडी, पण या धुराच्या रेषा पुढेजाऊन काळकभिन्न ठरतात, हे आपल्या लक्षात आले नाही. आज आपलं लक्ष गेलं. त्यानंतर इलेक्ट्रिक रेल्वे आल्या. मग मेट्रो आल्या. आपण चांगल्या गोष्टी फक्त घोषित करत आलो नाही, तर प्रत्यक्षात आणल्या, असे मुख्यमंत्री म्हणाले.

उंटावरून शेळ्या हाकणं नको -
पुणे तिथे काय उणे, असे आपण म्हणतो. पुण्याने एक नेतृत्व स्वीकराले असून जिथे शक्य असेल तिथे आयोजन करणार आहोत. जनजागृती झाल्यावर नुसते उंटावरून शेळ्या हाकणं नको. आपण काहीतरी केलं पाहिजे. त्यामुळे आपण पर्यायी इंधनावर चालणारी वाहने उपलब्ध करून देत आहोत, असे ठाकरे म्हणाले.

दिर्घकाळ टिकेल असा शाश्वत विकास गरजेचा -
कोरोनामुळे गेली दोन वर्ष ही आपल्याला बंधने होती. आता बंधन हटली आहेत. पण काळजी घ्वावी लागणार आहे. कोरोनाप्रमाणेच प्रदुषण हाही एक विषाणू आहे. त्यामुळे पर्यायवरण जपले पाहिजे. पर्यायवरणाची हानी होणार नाही, याची काळजी घेत, दिर्घकाळ टिकेल असा शाश्वत विकास करणे गरजेचे आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा धोका टाळायचा असेल तर पर्यायी इंधनासारख्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी महाराष्ट्राने पाऊल टाकलं आहे. याचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मला अभिमान आहे, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटलं.

परिषदेविषयी...
राज्य सरकारच्या पुढाकारातून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चर (एमसीसीआयए) यांच्यातर्फे ही ‘पुणे पर्यायी इंधन परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. सिंचन नगरच्या मैदानावर इलेक्ट्रिक, हायड्रोजन आणि जैव इंधनावरील वाहनांचे प्रदर्शन 2 ते 5 एप्रिल दरम्यान भरवण्यात येत आहे. पर्यायी इंधनांवरील वाहनांचे शहर म्हणून पुण्याचे स्थान देशात अधिक ठळक होण्यासाठी ही परिषद महत्त्वाची आहे.

बातम्या आणखी आहेत...