आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात मेंदू हॅक केल्याच्या तक्रारी:कुणी म्हणते- मेंदू हॅक करून कामे करून घेतली जातात, तर कुणाला वाटते माझ्या डोक्यातले विचार ऐकले जात आहेत

पुणे / मंगेश फल्लेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील एका नामांकित लष्करी महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून काम करणाऱ्या ३८ वर्षीय महिलेस तिचा मेंदू कोणीतरी हॅक केला असून तिच्या मनात जे विचार येतात त्याचप्रमाणे वेगवेगळ्या कृती घडत असल्याचे जाणवू लागले. त्यामुळे तिने थेट सायबर पोलिस ठाणे गाठत स्वत:ची कैफियत मांडली. मात्र, पोलिसांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मागील काही दिवसांपासून अशाच प्रकारच्या माइंड हॅकिंगच्या वाढत्या तक्रारी येऊ लागल्याने सायबर पोलिस चक्रावले आहेत.

याच पद्धतीने २५ वर्षीय एका उच्चशिक्षित तरुणाची पबजी गेम खेळताना ऑनलाइन एका तरुणीशी ओळख झाली. 2 महिने संपर्कात राहिल्यानंतर तिच्याशी बोलणे बंद झाले. परंतु त्यानंतर तिला काही सांगायचे तर ती मोबाइलवर पॉप करून गाणी पाठवते, तिचा फोटो मोबाइल स्क्रीनवर सातत्याने दिसतो, ती वारंवार त्रास देते असे भास तरुणाला होऊ लागले आणि त्याने याबाबत पोलिसांकडे धाव घेत याचा तपास करा अशी मागणी लावून धरली. माझा मोबाइल कोणीतरी हॅक केला, माझा सातत्याने पाठलाग कोणीतरी करते, माझ्या डोक्यात जे विचार ते कोणीतरी ऐकते अशा तक्रारी केल्या. परंतु अशा प्रकारात लेखी तक्रार दे असे पोलिसांनी सांगताच नेमके कोणते मुद्दे तक्रारीत द्यावे हे तरुणास समजेना झाले. दरम्यान, पोलिसांनी तरुणाचा फोन, फेसबुक तपासून पाहिला तर तो हॅक केला नसल्याचेही स्पष्ट झाले. याच प्रकारे कंपनीत काम करणाऱ्या तरुणाला त्याची पत्नी मोबाइलवर काही मेसेज करत असेल तर ते ऑफिसमधील इतरांना आपोआप समजतात, माझ्यावर कोणीतरी लक्ष ठेवून आहे, माझे कोणाला चांगले बघवत नाही असे भास होऊ लागले आणि त्याने पोलिसांकडे दाद मागितली.

भ्रमाशी निगडित आजार
मानसशास्त्रामध्ये व्यक्तीच्या अविवेकी विचारांशी संबंधित भ्रम (डेल्युजन) हा प्रकार असतो. त्यामध्ये स्वतःच्या परिवारातील ओळखीचे लोक, शेजारी, सोसायटीमधील लोक किंवा त्याच्याशी संबंधित असणारे लोक त्याला कोणत्या ना कोणत्या कारणाने इजा पोहोचविण्याचा किंवा मला नुकसान पोहोचविण्याचा प्रयत्न करते असे त्या व्यक्तीस वाटत असते. - प्रा. चेतन दिवाण, सहायक प्राध्यापक, मानसिक आरोग्य

संवाद वाढवण्याची गरज
माइंड हॅकिंगच्या तक्रारीच्या केसेस वाढत असल्याचे जाणवते. परंतु अशा प्रकारात संबंधित व्यक्तींचे समुपदेशन सायबर पोलिस कर्मचारी, अधिकारी करत आहेत. संबंधित व्यक्तींना लेखी तक्रार द्या असे सांगितले तर नेमकी कुणाविरोधात तक्रार द्यायची हे त्यांना समजून येत नाही. मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला त्यांना घ्या असे आम्ही सुचवतो, असे सायबर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी. हाके म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...