आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'एचसीएमटीआर':उच्च क्षमतेच्या द्रुतगती वर्तुळाकार मार्ग प्रकल्पाला सरकारने गती द्यावी; अन्यथा आमरण उपोषण - काँग्रेस नेते आबा बागूल

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सद्यस्थितीत पुणे शहरात वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. जीवघेण्या वाहतुकीमुळे होणाऱ्या अपघातांत बळींची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. शहरासाठी महत्वपूर्ण असणाऱ्या उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार ('एचसीएमटीआर') मार्गाबाबत सरकारने प्राधान्य आणि गती द्यावी अन्यथा आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा पुणे काँग्रेसचे माजी गटनेते आबा बागुल यांनी सोमवारी मुख्यमंत्री यांना लेखी पत्र देऊन दिला आहे.

बागुल म्हणाले, याबाबत मी गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करत आहे. आज ४२ वर्षे होत आली तरी हा सुरक्षित आणि गतिमान वाहतुकीसाठी दिलासादायक ठरणारा एच. सी. एम. टी. आर मार्ग अद्यापही रखडलेला आहे. निविदा प्रक्रियेपर्यंत आलेल्या या उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्गाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निधीचा मुद्दा उपस्थित करून लांबणीवर टाकण्याची भूमिका घेण्यात आली होती.

मुळात सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याने एच. सी. एम. टी. आर प्रकल्प निधी नाही म्हणून रद्द करता येत नाही. जर रद्दच करायचा असेल तर तो डी. पी. मध्येच रद्द करायला पाहिजे होता. आजमितीस वेगवेगळ्या बाबींवर त्यासाठी दहा ते बारा कोटी रुपये खर्च झालेले आहेत. तसेच भूसंपादनपोटी टीडीआर, एफएसआयही देण्यात आलेले आहेत. त्यामुळे केवळ अलाइनमेंट बदलण्याच्या नावाखाली किंवा ९ मीटर रस्ते या भानगडीत न पडता आपण २४ मीटरनुसारच या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया पुन्हा राबवावी.

सध्या विकास आराखड्यात दर्शविण्यात आल्यानुसार एकही रस्ता प्रत्यक्ष जागेवर नाही ही वस्तुस्थिती आहे आणि शासनानेही आपल्याला रस्ते आखण्याचे निर्देश दिलेले आहेत. हेही दुर्लक्षून चालणार नाही. त्यामुळे निधी नाही हे कारण देऊन आपण पुणेकरांच्या हितासाठी महत्वपूर्ण असणारा हा प्रकल्प रद्द अथवा लांबणीवर टाकू शकत नाही. निधीबाबत मार्ग काढणे सहजशक्य आहे.

आज सहा हजार कोटी रुपयांचा असणारा हा प्रकल्प उद्या ५० हजार कोटी रुपयांवर पोहचवल्यावर निविदा काढणार का ? हा प्रश्न देखील महत्वाचा आहे. त्यामुळे सर्व खात्यांची बैठक घेऊन उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार [एच. सी. एम. टी. आर] मार्गाला चालना देण्यात यावी.

या उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार रस्त्यासाठी होणाऱ्या चालढकल कारभाराविरोधात आता आम्हाला मुख्यमंत्री यांच्या दालनासमोर आमरण उपोषण करावे लागेल. मूठभर बिल्डर्स लॉबीचे हित जोपासण्यासाठी पुणेकरांचा श्वास वाहतूक कोंडीत गुदमरू देऊ नये.