आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस नेते सुरेश कलमाडी पुन्हा सक्रिय?:10 वर्षांनंतर पुणे महापालिकेत; गणेशोत्सवापूर्वी मेट्रो, रस्तेकामे पूर्ण करण्याची मागणी

पुणे8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी शुक्रवारी तब्बल दहा वर्षाच्या कालावधीनंतर पुणे महानगरपालिकेत दाखल झाले. अनेक वर्षांनंतर प्रथमच कलमाडी मनपात आल्याने वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा मनपा परिसरात रंगल्या. आगामी पुणे मनपा निवडणुकीपूर्वी कलमाडी पुन्हा राजकारणात सक्रिय होणार का? याबाबत तर्क वितर्क लढविण्यात येत आहे.

पालिका आयुक्तांना निवेदन

पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी पुण्यात सुरू असलेली मेट्रोची कामे व रस्ते विकास कामेही पूर्ण करून घ्यावी. तसेच, या कालावधीत श्री गणेश कलाक्रिडा रंगमंच, बालगंधर्व रंगमंदिर आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृह या ठिकाणी ३४ व्या पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन व सर्व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या परिसरातीलही मेट्रो व रस्ते विकासकामे गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करून घ्यावी. या कालावधीत पुणेकर नागरिकांना वाहतुक कोंडी व अन्य त्रास होऊ नये यासाठी ही कामे गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करणे गरजेचे असल्याचे निवेदन पुणे फेस्टिव्हलचे चेअरमन व माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी शुक्रवारी पुणे महानगरपालिकेत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना भेटून दिले.

सांस्कृतिक कार्यक्रम घ्यावेत

पुण्याचा नावलौकिक जगभर नेणाऱ्या व जागतिक पर्यटन नकाशावर पुण्याचे नाव ठळकपणे आणणाऱ्या पुणे फेस्टिव्हलला पुणे महानगरपालिकेतर्फे सहप्रायोजकत्व द्यावे, अशी विनंती देखील या निवेदनात करण्यात आली आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पुणे महानगरपालिकेने पुणे फेस्टिव्हलसह सर्व प्रभागांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करावे, अशी सूचनाही यावेळी केली. यावेळी पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, डॉ. सतिश देसाई आदि उपस्थित होते

बातम्या आणखी आहेत...