आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचे पुण्यात राज्यपालांच्या विरोधात आंदोलन:शिवरायांची बदनामी करण्याचा भाजप अन् संघाचा छुपा अजेंडा; काँग्रेसचा आरोप

पुणे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्या विरोधात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्य नेतृत्वाखाली बालगंधर्व चौक, झाशीची राणी पुतळा येथे जोडे मारून निषेध आंदोलन सोमवारी करण्यात आले. यावेळी भगतसिंग कोश्यारी व सुधांशू त्रिवेदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी बोलताना शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, महाराष्ट्राचे राज्यपाल हे महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान व त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधाने नेहमीच करीत असून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा व भाजपचा छुपा अजेंडा या संविधानिक पदावर बसून राबवित आहेत. त्याचप्रमाणे भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी हे इतिहासात नोंद नसलेल्या गोष्टींचा खोटा दाखला देऊन छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करीत आहे. सावरकरांबद्दल बोलल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी जाणून बुजून केली जाते याच बरोबर काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या महाराष्ट्रातील प्रचंड प्रतिसादालादेखील भारतीय जनता पार्टी घाबरली असून या यात्रेमुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्रातील कोणीही व्यक्ती सहन करणार नसून आगामी काळामध्ये महाराष्ट्रातील जनता यांना जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही.

यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे चिटणीस संजय बालगुडे यांनी ही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्यावर सडकून टिका केली.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, बाळासाहेब शिवरकर, वीरेंद्र किराड, रफिक शेख, अजित दरेकर, संगीता तिवारी, बाळासाहेब दाभेकर, कमल व्यवहारे, सोनाली मारणे, मेहबुब नदाफ, शेखर कपोते, द. स. पोळेकर, राजेंद्र शिरसाट, सुजित यादव, सचिन आडेकर, विजय खळदकर, रमेश सकट, अजित जाधव, राजेंद्र भुतडा, रमेश सोनकांबळे, सतिश पवार, सुनिल शिंदे, सौरभ अमराळे, शिवराज भोकरे, संजय खडसे, अक्षय माने आदीसह मोठ्या प्रमाणत कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...