आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना:तरुण अभियंत्यांची ‘निर्जंतुक ओव्हन बॉक्स’ची निर्मिती, सुरक्षा साधन बाहेरून आणलेल्या वस्तूंचे निर्जंतुकीकरण

पुणे10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘निर्जंतुक ओव्हन बॉक्स’ च्या निर्मितीमुळे घरात सुरक्षितता

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने वेगवेगळी उपकरणे निर्माण होत आहेत. दैनंदिन गोष्टींमध्ये काळजी घेणे आवश्यक झाल्याने पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथील तीन तरुण अभियंत्यांनी एकत्र येत “निर्जंतुक ओव्हन बॉक्स’ची निर्मिती केली आहे. यामध्ये घरात बाहेरून आणलेल्या वस्तू तीन ते पाच मिनिटांत निर्जंतुक होऊन वापरण्यास सुयोग्य होतात.

वेल्व्हिन सालेर, प्रतीक धोत्रे आणि शुभम एरंडे अशी या अभियंता तरुणांची नावे आहेत. लॉकडाऊनमध्ये रिकाम्या वेळेत एकत्रित तिघे बसून आपण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन उत्पादन काय करू शकतो याबाबत चर्चा करत होते. डीआरडीओने याच वेळी एक ऑटोमॅटिक निर्जंतुक बॉक्स बनवला होता, परंतु त्याची किंमत ३० हजार रुपये होती. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक अशा महागड्या गोष्टींचा सहजासहजी वापर करू शकत नाहीत ही बाब त्यांनी हेरली. नागरिकांना परवडू शकेल अशी वस्तू कशा प्रकारे कमी किमतीत तयार करता येईल याचा विचार करून कोणते तंत्रज्ञान वापरता येईल याबाबत त्यांनी विचारविनिमय केला. त्यानुसार दोन महिने प्रयत्न आणि संशोधन करून अल्ट्राव्हायोलेट किरणांचा वापर करून सूक्ष्म जिवाणू आणि विषाणू मारता येऊ शकतात अशा प्रकारे निर्जंतुक ओव्हन बॉक्स त्यांनी तयार केला. सुरुवातीला फायबर प्लास्टिक, लाकूड याचा वापर करून वेगवेगळे बॉक्स बनवण्यात आले. पण त्यामध्ये काही अडचण निर्माण झाल्याने आणि उपकरणाची किंमत वाढत असल्याने त्यांनी किफायतशीर दरात शीट मेटलचा बॉक्स तयार केला. वापरण्यास सुरक्षित आणि कमी वीज वापर या दृष्टीने त्यात उपाययोजना करून केवळ पाच हजार रुपयांत “वाइरो गार्ड’ हा मेक इन इंडियाच्या धर्तीवर निर्जंतुक बॉक्स तयार करण्यात आला. मास्क, मोबाइल, पाकीट, बेल्ट, कपडे, भाजीपाला, फळे, किराणा, नोटा, कागदपत्रे अशा प्रकारे सर्वच वस्तू या बॉक्समध्ये तत्काळ निर्जंतुक होऊ शकतात. या मशीनमुळे कोणत्याही प्रकारचा धोका नाही. याचा वापर घर, बँक, हॉस्पिटल, क्लिनिक, ऑफिस, सलून, कंपनी, दुकाने आदी ठिकाणी केला जाऊ शकतो. सर्वसामान्य लोकांना कोरोनापासून सुरक्षित राहता येऊ शकेल याप्रकारे एक नवीन उपकरण बनवू शकलो याचा आम्हाला आनंद आहे, अशी भावना तरुणांनी व्यक्त केली आहे.

बातम्या आणखी आहेत...