आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन शिक्षणप्रणाली:कंटेंट एक्स्प्रेस डिलिव्हरी प्रणाली विद्यापीठात कार्यान्वित

पुणे9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने ई-कंटेटची मिळेल सुविधा

पुणे ‘कंटेंट एक्स्प्रेस डिलिव्हरी’ (सीडीएक्स) ही ऑनलाइन शिक्षणप्रणाली भविष्यात शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवेल, असे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी येथे केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ई-कंटेंट डेव्हलपमेंट अँड लर्निंग इनोव्हेशन सेंटरतर्फे तयार करण्यात आलेल्या ‘कंटेंट एक्स्प्रेस डिलिव्हरी’ (CDX) या ऑनलाइन शिक्षणप्रणालीचे उद्घाटन पटवर्धन यांच्या हस्ते झाले त्या वेळी ते बोलत होते. डाॅ. पटवर्धन म्हणाले, कंटेंट एक्स्प्रेस डिलिव्हरी (CDX) ही ऑनलाइन शिक्षणप्रणाली ई-कंटेंट विकसित करण्यासाठीचे उत्तम व्यासपीठ असून भविष्यात ही ऑनलाइन शिक्षणप्रणाली शिक्षण क्षेत्रात नक्कीच क्रांती घडवून आणेल. कोरोनामुळे एक खूप चांगली गोष्ट घडली, ती म्हणजे समस्यांचे निदान आपण आपल्या देशातच शोधायला लागलो आहोत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तयार केलेली कंटेंट एक्स्प्रेस डिलिव्हरी (CDX) ही ऑनलाइन शिक्षणप्रणाली हे याचे उत्तम उदाहरण आहे. पाश्चिमात्य देशांकडून जे काही येईल ते चांगलेच असेल, असा यापूर्वी आपल्या सर्वांचा समज होता. आता आपण वैज्ञानिक आणि विद्यार्थिकेंद्रित दृष्टिकोनातून शिक्षण कसे घेता येईल याचा जास्त विचार करत आहोत. नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थी हा शिक्षणाच्या केंद्रस्थानी असणार आहे.

कुलगुरू डॉ. नितीन करमळकर म्हणाले, या ऑनलाइन शिक्षणप्रणालीचा वापर सध्या १७५ महाविद्यालयांनी सुरू केला आहे. कोरोनामध्ये ऑनलाइन शिक्षणप्रणालीची झालेली सुरुवात ही नक्कीच एक सकारात्मक बाब आहे. लॉकडाऊनच्या काळात अल्पावधीतच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे ई-कंटेंट तयार करण्याची ही सुविधा महाविद्यालयांना उपलब्ध करून देण्यात आली. १० हजारांहून जास्त महाविद्यालये जोडता येऊ शकतात एवढी या प्रणालीची क्षमता आहे.

‘ई-कंटेंट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे शिक्षणपद्धतीची गरज’
ई-कंटेंट डेव्हलपमेंट अँड लर्निंग इनोव्हेशन सेंटरच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर म्हणाल्या, ई-कंटेंट तयार करणे आणि ऑनलाइनच्या माध्यमातून तो ई-कंटेंट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे ही सध्याच्या शिक्षणपद्धतीची गरज आहे. कोविड १९ च्या काळात ऑनलाइन शिक्षणप्रणालीची गरज आणि उपयुक्तता आणखीनच अधोरेखित झाली आहे. हीच गरज ओळखून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ई-कंटेंट डेव्हलपमेंट अँड लर्निंग इनोव्हेशन सेंटर या विभागातर्फे लर्निंग मॅनेजमेंट सिस्टिम तयार करण्यात आली आहे. विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांच्या सर्व आवश्यकता लक्षात घेऊन ही सिस्टिम तयार करण्यात आलेली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ई-कंटेंट एक्स्प्रेस डिलिव्हरीद्वारे नाशिक, अहमदनगर आणि पुणे या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांमधील महाविद्यालयांना स्टुडिओ तयार करण्याची सुविधा देत आहे. ईसीडीएलआयसीमधील एक समर्पित टीम लर्निंग मॅनेजमेंट सिस्टिमच्या आयटी प्लॅटफॉर्मवरील प्रशिक्षण तसेच ई-कंटेंट तयार करण्याद्वारे महाविद्यालये आणि त्यांचे प्राध्यापक यांना प्रशिक्षणाद्वारे मदत करीत आहेत. कोविड १९ च्या काळात राष्ट्रीय स्तरावर नोंद घेतली जाईल असा पुढाकार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतला असून याबाबत महाविद्यालयांकडून सकारात्मक प्रतिसाद आला आहे.

बातम्या आणखी आहेत...